वृत्तसंस्था/ मुंबई
भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या सध्या घोट्याच्या दुखापतीतून सावरत असला, तरी 12 नोव्हेंबरला होणार असलेल्या नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याआधी तो परत येण्याची शक्यता नाही. 19 ऑक्टोबर रोजी पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात स्वत:च्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना पंड्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती.
न्यूझीलंड आणि इंग्लंडविऊद्धचे सामने त्यामुळे त्याने गमावले. आज गुऊवारी होणार असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याला आणि 5 नोव्हेंबरला होणार असलेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यालाही त्याला मुकावे लागणार आहे. भारताचा अंतिम लीग सामना 12 नोव्हेंबर रोजी बेंगळूरमध्ये नेदरलँड्सविऊद्ध होणार आहे. ‘ही एक किरकोळ दुखापत आहे. तो त्यातून ठीक होत आहे आणि शेवटच्या लीग सामन्यात खेळण्यासाठी तो परत येण्याची शक्यता आहे. तो थेट उपांत्य फेरीतील सामन्यात खेळण्याचीही शक्यता आहे’, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले.
सहा सामन्यांतून सहा विजयांसह भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. पंड्याच्या अष्टपैलू क्षमतेची उणीव भरून काढण्यासाठी संघाला दोन बदल करणे भाग पडले आहे. पंड्याच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापनाने पाच गोलंदाज वापरणे पसंत केले असून त्याच्या जागी सहाव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजीस येत आहे. मोहम्मद शमीच्या फॉर्ममध्ये व्यवस्थापनाला पंड्याची गोलंदाज म्हणून उणीव भासलेली नाही. परंतु संघाच्या संतुलनाच्या दृष्टीने पंड्या आवश्यक आहे.
इंग्लंडवर विजय मिळविल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी पंड्या लवकर परतण्याचा विश्वास व्यक्त केला होता. पंड्या बेंगळूरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सावरत आहे. वैद्यकीय पथक त्याची काळजी घेत आहे आणि हार्दिक तसेच एनसीएच्या संपर्कात आहोत. आम्ही काही दिवसांत नवीन माहिती मिळण्याची आशा बाळगतो, असे म्हांब्रे यांनी रविवारी सांगितले होते.









