शेवटच्या साखळी फेरीत हाँगकाँगविरुद्ध सहज विजय
कोलकाता (प. बंगाल) / वृत्तसंस्था
भारताने एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीतील आपल्या मोहिमेची हाँगकाँगविरुद्ध विजयाने यशस्वी सांगता केली. त्यांनी आपल्या शेवटच्या साखळी लढतीत 4-0 अशी एकतर्फी बाजी मारली. भारतीय संघातर्फे अन्वर अली, सुनील छेत्री, मानवीर सिंग व इशान पंडिता यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
भारताने यापूर्वी अफगाणविरुद्ध लढतीत वर्चस्व गाजवले, त्याचीच पुनरावृत्ती येथे हाँगकाँगविरुद्ध देखील केली. अन्वर अलीने दुसऱयाच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत भारताला आघाडी मिळवून दिली. एकीकडे, भारतीय संघ आघाडी भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे, हाँगकाँगने बरोबरीसाठी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले होते.
नंतर 45 व्या मिनिटाला मार्किंग नसल्याचा सुनील छेत्रीला लाभ झाला. जेक्सन सिंगच्या फ्री कीकवर त्याने गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. त्यानंतर मानवीर सिंगने 85 व्या मिनिटाला तर स्टॉपेज टाईममध्ये इशान पंडिताने संघाचा चौथा गोल नोंदवला.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल ः सुनील छेत्री पाचवा

आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहासात सर्वाधिक गोल नोंदवणाऱया खेळाडूंच्या यादीत सुनील छेत्रीने पाचव्या स्थानी संयुक्त बरोबरी साधली. 84 वा गोल करत छेत्रीने रियल माद्रिद व हंगेरियन खेळाडू फेरेन्क पुस्कासशी बरोबरी नोंदवली. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये छेत्रीने महान फुटबॉलपटू पेलेचा 77 गोलचा विक्रम मागे टाकला होता. सध्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोलचा विक्रम रोनाल्डोच्या (117 गोल) खात्यावर आहे. मेस्सी 86 गोलसह चौथ्या स्थानी आहे.









