ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
इंधन दरवाढीमुळे सर्वच वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचा (Petrol diesel) दर कमी करण्याचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे. त्यामुळे राज्यांनी पेट्रोलियम पदार्थांवरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी (hardeep singh puri) यांनी म्हटले आहे.
छत्तीसगडमधील महासमुंद येथे ते माध्यमांशी बोलत होते. हरदीप सिंग पुरी म्हणाले, इंधनदर वाढीमुळे महागाई गगणाला भिडली आहे. सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. राज्य सरकारांनी पेट्रोलियम पदार्थांवरील व्हॅट कमी करावा. जेणेकरुन इंधन काही प्रमाणात स्वस्त होईल आणि जनतेला दिलासा मिळेल. इंधनाचा वापर वाढेल तेव्हा 10 टक्के व्हॅटमधूनही राज्यांना चांगले उत्पन्न देईल. भाजपशासित राज्यांनी डिझेल आणि पेट्रोलवरील व्हॅट कमी केला आहे.
केंद्र सरकारने गेल्या वषी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते आणि राज्य सरकारांनाही तसे करण्यास सांगितले होते. छत्तीसगडमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर 24 टक्के व्हॅट आहे. तो 10 टक्क्मयांपर्यंत कमी केल्यास भाव आपोआप खाली येतील, असेही त्यांनी सांगितले.