अभियानाला उदंड प्रतिसाद ः अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळा धूमधडाक्यात सुरू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात शनिवारपासून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ मोठय़ा धूमधडाक्मयात साजरा करण्यास प्रारंभ झाला. ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियानालाही सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक घराबरोबरच शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापने, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवल्यामुळे सर्वत्र स्वातंत्र्यदिनाचे तेज दिसून येत होते. तसेच भारतीय लष्करी जवानांनी लडाखमध्ये 18,400 फूट उंचीवर तिरंगा फडकवत या सोहळय़ाची उंची आणखीनच वाढवली. दरम्यान, सोमवारी देशभर साजरा होणाऱया स्वातंत्र्यदिनाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला देशवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे संपूर्ण देश तिरंगामय झाला होता.
देशभरात सध्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा उत्साह आहे. यापूर्वी देशात तिरंगा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावण्याचा नियम होता. जुलै 2022 मध्ये सरकारने या नियमात सुधारणा केल्यामुळे आता रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकवता येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ या अभियानाची घोषणा केली होती. यावेळी देशभरातील जनतेला त्यांच्या घरावर किंवा कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्याची सूचना केली होती. या सूचनेला अनुसरून भारतीय पोस्ट विभागाने आपल्या कार्यालयांमध्येही तिरंगा विक्रीची मोहीम राबविली होती. ऑनलाईन ऑर्डर दिलेल्यांना ही सेवा घरपोचही उपलब्ध करण्यात आली होती.
पंतप्रधानांनी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या निवासस्थानी मुलांना तिरंगा वाटून मोहिमेची सुरुवात केली होती. याच अभियानादरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी आपल्या सरकारी निवासस्थानी तिरंगा फडकावला. याप्रसंगी त्यांच्या पत्नी सोनल शाह यासुद्धा उपस्थित होत्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील आपल्या सरकारी निवासस्थानी शाळकरी मुलांसमवेत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला चालना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी शनिवारी ‘हर घर तिरंगा अभियाना’चा एक भाग म्हणून मुलांना राष्ट्रध्वजाचे वाटप केले आणि आपल्या घरीही तिरंगा फडकवला.









