हापूस आंब्यासाठी आता ‘क्विक रिस्पॉन्स कोड’
विद्याधर पिंपळे कोल्हापूर
आंबा खाण्यामध्ये कोल्हापूर अग्रेसर आहे. आंब्याच्या पहिल्या सौद्यात पहिल्या हापूस पेटीसाठी सांगेल तेवढे पैसे मोजणारा कोल्हापूरचा आंबाशौकीन आहे. अस्सल हापूस आंबा लोकांपर्यंत पोहोचावा, आंब्याची फसवणूक टाळावी, यासाठी आता पुढील आंबा सिझनमध्ये, क्यूआर कोड असलेला आंबा कोल्हापूरच्या बाजारात येणार आहे, असे संकेत आंबा व्यापाऱ्यांमधून दिला जात आहे.
सध्या फळ बाजारपेठेमध्ये हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची विक्री सुरू आहे. अस्सल हापूस आंबा कसा ओळखायचा, याबाबत आंबा शौकीनांमध्ये अजूनही संभ्रमावस्था आहे. ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी, पुढील सिझनमध्ये कोल्हापूरच्या मार्केट यार्डमध्ये क्यूआर कोड असलेला आंबा बाजारात येणार असल्याच्या माहितीला आंबा व्यापाऱ्यांकडून दुजोरा दिला जात आहे.
फळ बाजारपेठेमध्ये विविध आंबा बाजारात येत आहे. यामध्ये चांगला व उच्च प्रतीचा आंबा कसा ओळखायचा, हे समजून येत नाही. लोकांची फसवणूक टाळण्यासाठी आता कोल्हापूर मार्केट यार्डमध्ये क्यूआर कोड असलेला आंबा येणार आहे. आंबा शेतकरी व बागायतदारांनी, भौगोलिक निर्देशांक (जीआय) असलेल्या हापूस आंब्यासाठी आता ‘क्विक रिस्पॉन्स कोड’ (चौरस ग्रीडमध्ये काळे चौरस ठिपके) चा वापर सुरू केला आहे. त्यामुळे हापूस आंब्यांची सगळी ‘कुंडली’ पहावयास मिळणार आहे. त्यामुळे ग्राहक, व्यापाऱ्यांची फसवणूक थांबणार आहे.
बाजारात अनेक प्रकारचे व अनेक दर्जाचे आंबे हापूसच्या नावाखाली विकले जात आहेत. यासाठी कोकणातील पाच जिल्ह्यांतील 1 हजार 773 बागायतदारांनी हापूसला मानांकन घेतले असल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक हापुस आंबा व बॉक्सवर क्यूआर कोड दिला जात आहे. यासाठी बागायतदारांनी हापूस आंब्याची विक्री करताना, जीआय मानांकन घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय क्यूआर कोड करता येत नाही. यासाठी विशेष कंपनीबरोबर करार करावा लागतो. किमान आठ लाख हापूस आंबा फळ किंवा 1 लाख बॉक्स क्यूआरसाठी असणे आवश्यक आहे. क्यूआर कोडसाठी प्रति आंबा 65 पैसे तर प्रति बॉक्स तीन रूपये बागायतदारांना मोजावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
या क्यूआर कोडसाठी स्कॅनेंग मशिन वा स्मार्ट फोनचा वापर केल्यास त्या हापूसची माहीती तात्काळ मिळणार आहे. यामध्ये आंब्याची एक्स्पायरी डेट, आंब्यांचे पॅकींग तारीख, आंबा परिपक्व होण्याची तारीख, बागायतदारांची सविस्तर माहिती असते. यामध्ये बागेचा फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्यांची माहिती, मोबाईल नंबर, ई-मेल आदीचा क्यूआर कोडमध्ये समावेश आहे. यामुळे पुढील सिझनमध्ये आंबा ग्राहकांची फसवणूक टाळली जाणार आहे.
पुढील सिझनमध्ये क्यूआर कोड चा आंबा कोल्हापूरात
कोकणातील हापूस आंबा थेट कोल्हापूर मार्केट यार्डमध्ये येत आहे. व्यापाऱ्यांच्या विश्वासावरच ग्राहक आंब्याची खरेदी करत आहेत. पण आता हापूस आंब्यांबाबत संभ्रमावस्था आहे. अस्सल हापूसची चव घेण्यासाठी आता, पुढील सिझनमध्ये हापूस आंबा क्यूआर कोडमध्ये येणार असून, याची तयारी सुरू आहे.
इम्रान बागवान, होलसेल आंबा व्यापारी, मार्केट यार्ड