सातारा / प्रतिनिधी :
काँग्रेसचा विजय असो, राहुल गांधी यांचा विजय असो.. अशा घोषणा देत काँग्रेस कमिटीसमोर फटाके फोडून कार्यकर्त्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्यांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. कर्नाटक निवडणुकीच्या निकालाने काँग्रेस कार्यालयात आनंदीआनंद पहायला मिळाला. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना महिला पदाधिकारी सुषमाराजे घोरपडे यांनी भाजपाचा सडकून समाचार घेतला.
सुषमाराजे घोरपडे म्हणाले, कर्नाटक मधील काँग्रेसच्या विजय हा निकाल ‘भारत जोडो’ यात्रेचा सकारात्मक परिणाम आहे. या निवडणुकीमध्ये कर्नाटकमधील जनतेने जातीयवाद, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, ईडी आणि सीबीआयचा वापर, महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि सर्वसामान्यांचा जगण्याचा अधिकार याबद्दल सडेतोड उत्तर जनतेने दिले आहे. कर्नाटकमध्ये भाजपाने आपल्या फायद्यासाठी बजरंग बलीचे नाव वापरून धर्माच्या आड मतांची भीक मागितली. संघाने द केरला स्टोरीच्या नावे लव जिहादचा खोटा प्रचार करून केरळची बदनामी केली. याउलट कर्नाटकमधील जनतेने धर्माच्या नावाखाली केलेल्या प्रचाराला सडेतोड उत्तर दिले. हा विजय लोकशाहीचा विजय आहे, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई म्हणाले, कर्नाटक मध्ये सर्व सामान्य जनतेने काँग्रेसच्या मागे उभे राहून भाजपचे हुकुमशाही प्रवृतीला नाकारले आहे. यापुढे देशाला काँग्रेस पक्षच प्रगतीपथावर नेऊ शकतो, असा विश्वास तेथील जनतेला वाटल्याने त्यांनी काँग्रेसला हात दिला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच हे फलित आहे. काँग्रेसच्या विजयाचा मार्ग कर्नाटक राज्यातून आता पुढे जाईल आणि 2024 ला दिल्लीत काँग्रेसच सरकार येईल असा विश्वास वाटतो. असे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसच्या धनश्री महाडिक, सुषमाराजे घोरपडे, ऍड. दत्ता धनावडे, ऍड. विजयराव कणसे, मनोजकुमार तपासे, रफीक बागवान, अन्वर पाशा खान, अरबाज शेख, सचिन पवार, कुंभार, रजिया शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.









