लाखो रुपये खर्ची : जलतरणपटूंची मोठी गैरसोय : चार वर्षापासून दुर्लक्ष
बेळगाव ; मागील चार वर्षापासून बॉक्साईट रोड, हनुमाननगर येथील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तब्बल पाच कोटी रुपये खर्चून बांधलेला तलाव वापराविना पडून असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जलतरणपटूतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय जलतरण तलावासाठी खर्च केलेला निधीदेखील वाया गेला आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया स्विमिंग प्रशिक्षक व खेळाडूंतून व्यक्त होत आहेत. ऑलिम्पिक खेळाडूंसाठी 2016 मध्ये या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र तो अद्याप उद्घाटनाअभावी तसाच आहे. त्यामुळे खेळाडूंना खासगी तलावावरच अवलंबून राहावे लागत आहे. तलावाचे उद्घाटन झाले नसल्याने जलतरणपटूंना पोहोण्याच्या सरावापासून दूर राहावे लागले आहे.
पोहोण्याचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय
आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या दर्जानुसार या तलावाची बांधणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप खेळाडूंसाठी उपलब्ध करण्यात आला नाही. बांधकाम झाले मात्र उद्घाटन कधी? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. शहरात सार्वजनिक जलतरण तलावांची संख्या कमी आहे. त्यातच नव्याने उभारलेल्या जलतरण तलावाचे उद्घाटन झाले नाही. त्यामुळे पोहोणाऱ्यांची कुचंबणा होऊ लागली आहे. उन्हाळी सुटीमुळे पोहोण्याचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील गैरसोय झाली आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे बांधकाम
हनुमाननगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलावाचे बांधकाम करण्यात आले आहे. तब्बल 50 बाय 100 मीटरचा हायटेक स्विमिंग पूल उभारण्यात आला आहे. शिवाय महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तलावाच्या बांधकामाला 2016 मध्ये सुरुवात झाली होती. तर 2019 ला पूर्ण झाले होते. मात्र 2023 उजाडले तरी अद्याप जलतरण तलाव खुला करण्यात आला नाही. त्यामुळे तलावासाठी खर्ची घातलेला निधी वाया गेला आहे.
विजयनगरमध्येही तलावाचे काम अर्धवट
महानगर पालिकेने विजयनगर परिसरात जलतरण तलावाचे बांधकाम केले आहे. मात्र निधीअभावी या जलतरण तलावाचे काम देखील अर्धवट आहे. 2 कोटीच्या निधीतून 2016 ला या जलतरण तलावाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. अनुदानाअभावी काम अर्धवट आहे. त्यामुळे जलतरण तलावाच्या बांधकामास निधी उपलब्ध होणार की नाही? असा प्रश्नदेखील जलतरणपटूतून विचारला जात आहे.
तलाव लवकरच खुला करणार
हनुमाननगर येथील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव बंद आहे. वाढत्या उन्हात पाण्याअभावी हा तलाव बंद आहे. लवकरात लवकर हा तलाव खुला केला जाईल.
डॉ. रुद्रेश घाळी, मनपा आयुक्त








