सुधाकर काशीद,कोल्हापूर
Hanuman Jayanti Special 2023 : प्रत्येक गावालगत एक पिंपळाचे झाड त्या झाडाखाली दगडी पार आणि त्या पारावर मारुतीचे छोटे मंदिर असते. हे मंदिर म्हणजे त्या गावची वेस असते. सळसळत्या पिंपळाच्या झाडाखालचे हे मारुती मंदिर गावाच्या अस्तित्वाची साक्ष असते. वेशीवरचा मारुती अशी या मारुतीची ओळख झालेली असते. कोल्हापुरात आइतवार वेस म्हणजे, रविवार वेशीजवळ म्हणजेच, आताच्या बिंदू चौक तुरुंगाच्या तटबंदीला लागून आतल्या बाजूस एक मारुतीचे मंदिर आहे. तेथे हे मंदिर असण्याचे कारण म्हणजे रविवार वेशीवरचा तो मारुती होता. काळाच्या ओघात शहराच्या भोवती तटबंदी झाली. तटबंदीला लागून तुरुंग झाला. वेशीवरचे मारुती मंदिर तटबंदीच्या आत गेले. आणि तुरुंगाच्या तटबंदीवरचा मारुती म्हणून या मारुतीला ओळखले जाऊ लागले.
आज मारुती, नवश्या मारुती, शनि मारुती, रेल्वे मारुती, जय प्रभा मारुती, घाटावरचा मारुती, बावडा मारुती, मठ मारुती, रंकाळ वेश मारुती, ओढ्यावरचा मारुती अशा शहरातील विविध मारुतीच्या मंदिरात भाविकांची गर्दी फुलेल. पण तुरुंगाच्या तटबंदीवरच्या या मारुतीचे दर्शन मात्र परंपरेप्रमाणे फक्त तुरुंगाच्या कर्मचाऱ्यापुरतेच असेल.
कोल्हापूर शहर आठव्या नवव्या शतकाच्या आसपास ब्रह्मपुरी टेकडी, उत्तरेश्वर ,गंगावेस, रंकाळा, वरूण तीर्थ ,केसापूर पेठ अंबाबाईचे मंदिर झाले. आणि त्या भोवती शहर नव्याने विस्तारत गेले. त्या काळातल्या सुरक्षा नियोजनानुसार शहरा भोवती तटबंदी बांधण्यात आली. रविवार वेस ( बिंदू चौक) वरूण तीर्थ वेस, गंगावेस, शनिवार वेस, मंगळवार वेस अशी प्रवेशद्वारे या तटबंदीला होती. यापैकी रविवार वेशी जवळ (बिंदू चौक) पिंपळाचे झाड व मारुतीचे मंदिर होते. दगडी तटबंदी बांधताना हे मंदिर तटबंदीच्या आत गेले. त्यानंतर तटबंदीला लागूनच तुरुंग बांधण्यात आला. त्यामुळे रविवार वेशीवरचा हा मारुती तुरुंगाच्या तटबंदी आड गेला.
तटबंदी बांधताना केवळ मारुतीचे मंदिरच नव्हे, एक छोटा दर्गाही या तटबंदीच्या आड गेला. या दोन्हीची तुरुंग कर्मचाऱ्यांच्या वतीने नियमित पूजा अर्चा होते. मारुती मंदिरात मारुती जन्मोत्सव सोहळा तुरुंग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत होतो.दर्ग्याचा उरूसही कर्मचाऱ्यांच्या वतीनेच होतो. त्यामुळे या दोन्ही धार्मिक स्थळांचे जतन झाले आहे . तुरुंगाच्या तटबंदी आडचा हा मारुती फक्त कोल्हापुरातील जुन्या पिढीलाच माहिती आहे. त्यामुळे तटबंदीच्या भिंतीला जाता जाता श्रद्धेने नमस्कार करतात. तटाच्या आत मारुतीचे मंदिर आहे हे खूप श्रद्धेने सांगतात. यातले मारुतीचे मंदिर, छोटा दर्गा हे जसे श्रद्धेचे प्रतीक आहेत ,तसेच कोल्हापूरच्या जुन्या आठवणींचे ते अस्सल पुरावेच आहेत.
बिंदू चौकातील तटबंदीचे बांधकाम चालू असताना तिथे शेषनारायणाची मूर्तीही सापडली होती. या मूर्तीची मिरजकर तिकटी येथे त्या वेळच्या एका चौकीत प्रतिष्ठापना करण्यात आली. आज ही मूर्ती खूप रेखीव अवस्थेत पाहायला मिळते. ही मूर्ती देखील कोल्हापूरच्या प्राचीनत्वाची एक साक्ष आहे.
Previous Articleशियेत बिबट्याकडून रेडकू फस्त, परिसरात भितीचे वातावरण
Next Article झारखंडमध्ये चकमकीत पाच नक्षलींना कंठस्नान









