मध्यप्रदेश राज्याच्या भिंड जिल्ह्यात एक मंदीर आहे. भगवान हनुमानाचे हे मंदिर साधेसुधे नाही. कारण येथे प्रत्यक्ष हनुमानच डॉक्टर आहेत आणि ते रुग्णांवर औषधोपचार करतात अशी परिसरातील साऱ्यांची मान्यता आहे. आपल्याला कोणताही रोग असो, या मंदिरात भगवान हनुमानाकडूनच त्यावर उपचार केले जातात. केवळ मध्यप्रदेशच नव्हे, तर अनेक राज्यांमधून येथे भाविक रुग्ण येतात आणि आपली शारीरिक व्यथा हनुमानजींना सांगतात.
हे हनुमान मंदिर प्राचीन असून भिंड शहरवासियांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. येथे प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी प्रचंड संख्येने भाविक येतात. मनोकामना पूर्ण करणारे हे मंदिर आहे अशी दृढ श्रद्धा आहे. या मंदीरातील हनुमानाची मूर्तीही प्रचंड आकाराची असल्याने याला ‘बडे’ हनुमानका मंदिर अशीही संज्ञा आहे. आपल्या भक्तांवर औषधोपचार करण्यासाठी स्वत: भगवान हनुमान डॉक्टरच्या रुपात येथे येतात आणि भक्तांना बरे करतात अशी श्रद्धा येथे आहे. तसा अनुभवही अनेक भक्तांना आलेला आहे. कर्करोग आणि क्षयरोगसारखे दुर्धर रोगही येथे आल्याने बरे होतात, असे अनेक भक्तांचे म्हणणे आहे. केवळ रुग्णच येतात असे नाही. निरोगी लोकही येथे दर्शनासाठी प्रचंड गर्दी करतात. त्यामुळे हे मंदीर केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्धीस पावलेले आहे.









