श्रेया पोटे सामनावीर
प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमी आयोजित हनुमान चषक 12 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सीसीआय संघाने अनिल सांगावकर क्रिकेट अकादमी कोल्हापूर संघाचा दहा धावांनी पराभव करून हनुमान चषक पटकाविला. श्रेया पोटे हिला सामनावीर तर इशान देवन कोल्हापूर याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
सकाळी खेळविण्यात आलेल्या दुसऱया उपांत्य सामन्यात आनंद अकादमी ब संघाने 20.2 षटकात सर्व बाद 83 धावा केल्या. गणेश मराठेने 19 धावा केल्या. अनिल सांगावकर संघातर्फे इशान देवनने 11 धावात 3, आदित्य पाटोळेने 15 धावात 2, आर्चित वेताळने 20 धावात 2 तर आयुष पाटील, गंधर्व चौगुले यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
अंतिम सामन्यात सीसीआय स्पोर्ट्स क्लबने 20 षटकात 4 बाद 153 धावा केल्या. श्रेया पोटेने 1 षटकार व 6 चौकारासह 50 धावा करून अर्धशतक झळकविले. झोया काझीने 2 चौकारासह 17 तर कलश बेन्नीकट्टीने 3 चौकारासह 16 धावा केल्या. कोल्हापूरतर्फे आर्चित वेताळ व इशान देवन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अनिल सांगावकर क्रिकेट अकादमी कोल्हापूर संघाने 20 षटकात 6 बाद 143 धावाच केल्या. इशान देवनने 5 चौकारासह 54 धावा करून अर्धशतक झळकविले. अर्जुन घोरपडेने 26, श्रेयस पाटीलने 20, प्रज्वल पाटीलने 11 धावा केल्या. सीसीआयतर्फे स्वयम खोत, वरदराज पाटील, खंडू पाटील, श्रेया पोटे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे के. आर. शेट्टी फौंडेशनचे अध्यक्ष प्रणय शेट्टी, प्रशांत लायंदर, वासीम धामणेकर, आनंद करडी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सीसीआय व उपविजेत्या अनिल सांगावकर क्रिकेट अकादमी संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज वेदांत बाजल, उत्कृष्ट गोलंदाज आर्चित वेताळ, मालिकावीर इशान देवन यांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.









