ऑनलाईन टीम/तरुण भारत
हनुमान चालिसा पठण वादामुळे चर्चेत आलेले खासदार नवनीत राणा (navanit rana) आणि रवी राणा (ravi rana)यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दोघांवर न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचे याचिकेत म्हटले आहे. वास्तविक, न्यायालयाने राणा दाम्पत्याला सशर्त जामीन दिला होता. २७ जून रोजी कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
२३ एप्रिल रोजी झाली होती अटक
राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी (mumbai police) २३ एप्रिलला अटक केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणावरून झालेल्या वादातून दोघांना अटक करण्यात आली. त्यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने दोघांनाही सशर्त जामीन मंजूर केला होता.
या तीन अटींवर जामीन मंजूर करण्यात आला
न्यायालयाने राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला होता. राणा दाम्पत्य पुन्हा असा गुन्हा करणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. याशिवाय ते साक्षीदार किंवा पुराव्याशी छेडछाड करणार नाहीत. राणा दाम्पत्य या विषयावर पत्रकार परिषद घेणार नाही किंवा मीडिया किंवा सोशल मीडियावर कोणतेही वक्तव्य करणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. कोणत्याही अटीचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्याचा जामीन रद्द करण्यात येईल.