भाजप नेते किरीट सोमय्या आणि मोहीत कंबोज यांच्यावर झालेला हल्ला बघता भविष्यात भाजप आणि शिवसेनेतील लढाई ही आता रस्त्यावरची लढाई झाली असून येत्या काळात उभय पक्षांमध्ये संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. हनुमान चालीसा पठण करण्यावरुन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने केलेल्या गदारोळानंतर बाळासाहेबांचा आक्रमक शिवसैनिक पुन्हा एकदा बघायला मिळाला असून हनुमान चालीसामुळे नफा कोणाचा झाला असेल तर तो शिवसेनेचा कारण हनुमान चालीसामुळे पाहुण्याच्या काठीने विंचु मारावा तसे शिवसैनिकांना बुस्टर मिळाल्याचे दिसत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेना आणि भाजपमधील आरोप प्रत्यारोप आणि लुटुपुटुची लढाई ही पहिल्या दिवसापासून सुरू आहे. मात्र गेल्या अडीच वर्षात या दोन पक्षांमध्ये रस्त्यावरची लढाई कधी बघायला मिळाली नव्हती. बाळासाहेबांचा शिवसैनिक आता राहीला नाही शिवसेना ही जनाबसेना झाल्याचे बोलताना अनेक आरोप भाजपच्यावतीने शिवसेनेवर करण्यात आले. केवळ सत्तेसाठी आक्रमक स्वभाव असलेल्या शिवसेनेने आपली तत्वे गुंडाळल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र गेल्या आठवडय़ात कधी नव्हे ती शिवसेना आणि शिवसैनिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आणि भाजपच्यावतीने आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भाजपने मुंबईभर पोलखोल कार्यक्रमाचे आयोजन केले आणि इथुनच शिवसेनेने पुन्हा एकदा ‘आवाज कुणाचा’ म्हणत थेट शिवसेना आणि भाजप समोरा समोर आली आणि शिवसेनेने भाजपच्या पोलखोल कार्यक्रम अनेक ठिकाणी उधळून लावला. चेंबुरमध्ये तर थेट पोलखोल कार्यक्रमाच्या रथाची तोडफोड करण्यात आली.

भाजपने शिवसेनेला डिवचण्यासाठी अनेक कार्यक्रम मुंबईत घेतले. शिवसेनेचे विशेषतः उध्दव ठाकरे यांचे नंबर एकचे शत्रु असलेल्या नारायण राणे यांची केंद्रात मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर राणे यांनी जन आशिर्वाद यात्रेदरम्यान राणा दाम्पत्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्क येथील स्मारकावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करण्याची घोषणा केली. शिवसैनिकांनी त्यावेळी विरोधही केला पण त्यांनी राणेंना रोखले नाही, आता दोन दिवसापूर्वी राणा दाम्पत्याने अशाच राणा भिमदेवी थाटात मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केली आणि शिवसेनेने विरोध केला. राणेंना शिवसेनेने रोखले नाही तो मुद्दा वेगळा होता मात्र राणांना रोखले कारण हिंदुत्वाच्या मुद्यावरुन थेट घरासमोर येण्याची घोषणा केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट राणांना आव्हानच दिले. राणा दाम्पत्याने केलेली ही घोषणा त्यांची वैयक्तिक असल्याने त्यांच्या रक्षणासाठी कोणी भाजपवाले आले नाही. शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर आणि राणांच्या घराबाहेर केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे अखेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता झाली त्यातच आपल्या संकल्पाची वेळ टळून गेल्यानंतर राणा दाम्पत्याने आपला संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित दौऱयामुळे मागे घेत असल्याची घोषणा केली. या दरम्यान आक्रमक झालेल्या शिवसैनिकांकडून भाजप नेते किरीट सोमय्या आणि मोहीत कम्बोज यांच्यावर हल्ला झाला. आता याचा गुन्हा नोंद होऊन तपास केला जात असला तरी हनुमान चालीसा पठण करण्याच्या राणा दाम्पत्याच्या हट्टामुळे अमरावती ते मुंबईपर्यंत शिवसैनिक आक्रमक झाले. त्यामुळे या घटनेने शिवसैनिकांना मात्र बुस्टर मिळाला.
आता लढाई अंतिम टप्यात
शिवसेना भाजपमधील संघर्षाचा पहिला अंक हा ईडी, सीबीआय आणि आयटीच्या धाडसत्रातून झाला. या अंकात प्रताप सरनाईक, संजय राऊत, नवाब मलिक, श्रीधर पाटणकर यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. मात्र इतके होऊनही शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी ज्या भाजपने मुंबईतील आझाद मैदान येथे मोर्चा काढला. मोठे शक्ती प्रदर्शन अधिवेशन काळात केले, मात्र राज्य सरकारने अजूनपर्यंत मलिकांचा राजीनामा न घेण्यावर ठाम राहत भाजपच्या मागणीला भिक घातली नाही. ईडी आणि आयकर विभागाच्या शिवसेना नेत्यांवर एकामागून एक होत असलेल्या कारवाईनंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ऍक्शन मोडमध्ये आले आणि भाजप नेते प्रवीण दरेकर, नारायण राणे, मोहीत कम्बोज, किरीट सोमय्या त्यांचे पूत्र निल सोमय्या आणि नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर झालेल्या आरोपानंतर या नेत्यांच्या विविध चौकशीचे आदेश आणि गुन्हे दाखल झाले. सध्या दरेकर, राणे, सोमय्या पिता पूत्र यांना न्यायालयाने दिलासा दिला असला तरी त्यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. एकमात्र नक्की आता शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष वाढणार आणि तो आता रस्त्यावरचा असणार यात शंका नाही. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हिटरलसारखे कुणी वागत असेल तर संवादापेक्षा संघर्ष बरा असे बोलताना संघर्षात रणशिंग फुंकले तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान केल्या गेलेल्या लता मंगेशकर पुरस्कार कार्यक्रमाला न जाता, 80 वर्षाच्या शिवसैनिक असलेल्या फायर आजीची सहकुटुंब भेट घेणं आणि या भेटीवेळी शिवसैनिक झुकनेवाला नही है ही प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते.
प्रवीण काळे








