वृत्तसंस्था / तेहरान
इराण समर्थित हमास या संघटनेचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया याच्या हत्या प्रकरणात इराणमध्ये धरपकड सत्र सुरु करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये 24 जणांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी होत आहे. हानिया याची हत्या इराणची राजधानी तेहरानच्या सुरक्षित विभागात झाली होती. ती कोणी केली यासंबंधी अद्याप स्पष्टता नाही. तथापि इराणने या हत्येसाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. इस्रायलला साहाय्य करणाऱ्या इराणमधील नागरीकांवर इराणी प्रशासनाचा संशय असून अशा सहानुभूतीदारांना शोधण्यासाठी देशभरात प्रयत्न होत आहेत. हानिया याची हत्या इराणच्या भूमीवर झाल्याने तो या देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे मारेकऱ्यांचा शोध इराणच्या प्रशासनाकडून देशभर सर्वत्र युद्धपातळीवर घेतला जात असल्याची माहिती आहे.









