कोल्हापूर :
ई–केवायसी प्रमाणिकरण, स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी मान्यता देणे, बँक खाती आधार सिडिंग करणे आणि भूमी अभिलेख नोंदी अद्यावत केली नसल्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील 22 हजार 278 लाभार्थ्यांवर टांगती तलवार आहे. 31 मे पर्यंत लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर जूनचा दोन हजारच्या हप्त्यापासून त्यांना वंचित राहावे लागणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून कार्यरत असून प्रती हप्ता प्रती लाभार्थी 2 हजार रुपये या प्रमाणे आजअखेर 18 हप्त्याचा लाभ वितरित करण्यात आला. केंद्रशासन पी. एम. किसान योजनेचा माहे एप्रिल, 2025 ते जून 2025 या कालावधीतील 20 वा हप्ता जूनमध्ये वितरित होणार असून विविध त्रुटींच्या पूर्ततेअभावी सुमारे 22 हजार 278 लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. यासाठी जिह्यात 31 मे 2025 पर्यंत मोहीम राबवून शेतकऱ्यांचे ई–केवायसी प्रमाणिकरण, स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी मान्यता देणे, बँक खाती आधार सिडिंग करणे आणि भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबीची त्यांना पूर्तता करावी लागणार आहे. पी. एम. किसान योजनेंतर्गत ई–केवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे, भूमिअभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना समक्ष हजर असणे आवश्यक आहे.
एकूण कागदपत्र अपुरी असणारे लाभार्थी – 22 हजार 278
ई – केवायसी प्रमाणीकरण नसणारे लाभार्थी– 6 हजार 371
नव्याने नोंदणी करावयाचे लाभार्थी – 429
बँक खाते आधार सिडिंग करणे – 11 हजार 619
बँक खाते बंद असणारे लाभार्थी – 1 हजार 366
भूमी अभिलेख नोंद केले नसलेले लाभार्थी – 2 हजार 493
- …तरच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ
केंद्र शासन पी. एम. किसान योजनेचा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये वितरित होणार असून त्यापूर्वी प्रलंबित बाबींची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे. तसेच पी. एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थीनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल. यास्तव या दोन्ही योजनांच्या लाभासाठी 31 मे 2025 पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता मोहिमे दरम्यान करावी तसेच अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.








