अबकारी आयुक्तांना घातला काँग्रेसने घेराव
पणजी : मद्य व्यावसायिक व खुद्द सरकारच्या अबकारी खात्याची फसवणूक करणाऱ्या याच खात्यातील सरकारी नोकरांवर दयामया न दाखवता त्यांच्या कठोर कारवाई करण्याबरोबरच हे अबकारी घोटाळा प्रकरण पोलिसांकडे सोपवून गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी काल, बुधवारी काँग्रेसच्या नेत्यांनी केली. अबकारी आयुक्त नारायण गाड यांना घेराव घालत अबकारी मद्य परवाने घोटाळाप्रकरणाचा जाब विचारला. याप्रश्नी काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स, प्रदीप नाईक, विजय भिके, हृदयनाथ शिरोडकर, जनार्दन भंडारी, महेश म्हांबरे व कार्यकर्त्यांनी अबकारी आयुक्तालयावर धडक देऊन गाड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. 76 मद्य व्यवसायिकांकडून परवाना नुतनीकरणाच्या नावाखाली लाखो ऊपये शुल्क स्वत:च्या घशात उतरू पाहणारे घोटाळेबाज करकून दुर्गेश नाईक, विभुती शेट्यो व व्यावसायिकांना अबकारी निरीक्षकांच्या सहीची चलने देणारे अधिकारी यांचे हे कृत्य भयानक आहे. त्यामुळे यांच्यावर कोणतीही दया न दाखवता त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.
अबकारी आयुक्त नारायण गाड हे दबावाखाली वावरत आहेत. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या लोकांची नावे ते जाहीर करत नाहीत. याचा अर्थ भाजप सरकारच भ्रष्टाचारी बनल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केल. 2010 साली काँग्रेस सरकार सत्तेत असताना अबकारी घोटाळ्याबाबत विनाकारण भाजप आवाज उठवत होते. परंतु आता अबकारी खात्यातील कारकून, अधिकारी हे दोषी आढळल्याने भ्रष्टाचारी सरकार हे भाजपचेच असल्याचे सिद्ध झाल्याचे काँग्रेस नेते जनार्दन भंडारी म्हणाले. राज्यातील काही ठिकाणी शेतजमिनीत बारना परवानगी देण्यात आलेली आहे. अबकारी अधिकारी गैर मार्गाने पैसे उकळतात आणि परवाने देतात. नावापुरतीच अधिकारी सुनावणी घेतात, असा आरोप काँग्रेसने केला.अबकारी आयुक्त नारायण गाड यांना आतापर्यंत पाच निवेदने दिलेली आहेत. तपासणी नाक्यांवर अबकारी खात्याचे निरीक्षक लाच घेतात. त्याविषयी माहिती देऊनही अबकारी खात्यातर्फे कोणतीच कारवाई केली जात नाही.”
– जनार्दन भंडारी, काँग्रेस नेते.
“मद्य व्यावसायिकांपुढे अनेक समस्या आहेत. तरीही ते आपला व्यवसाय करण्यासाठी परवान्यांचे नुतनीकरण करतात. या प्रकरणी व्यावसायिकांची मोठी फसवणूक झालेली आहे. कारकून, अधिकारी यात गुंतले असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांकडे देणे गरजेचे आहे.”
– एल्विस गोम्स, काँग्रेस नेते









