तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा विचित्र दावा
वृत्तसंस्था / हैदराबाद
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी पूरग्रस्त भागांची हवाईपाहणी केली. भद्राचलमचा दौरा केल्यावर एका बैठकीला संबोधित करताना केसीआर यांनी विचित्र वक्तव्य केले आहे. तेलंगणातील पावसामागे विदेशी शक्तींचा हात असण्याचा संशय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ढगफुटीसारखी एक नवी बाब समोर आली आहे. देशाबाहेरून कुणीतरी ढगफुटी घडवून शत्रुत्व पार पाडत आहे. यापूर्वी लडाखनजीक लेहमध्ये मग उत्तराखंडमध्ये आणि आता गोदावरी खोऱयात ढगफुटीची घटना घडत आहे. हवामानात कुठल्याही कारणांमुळे बदल होत असला तरीही लोकांचे रक्षण करायचे आहे, असे उद्गार केसीआर यांनी काढले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरग्रस्तांसाठी उंच ठिकाणांवर कायमस्वरुपी वसाहती निर्माण करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना तत्काळ मदत म्हणून 10 हजार रुपयांची घोषणा त्यांनी केली आहे. याचबरोबर 2 महिन्यांपर्यंत प्रत्येक कुटुंबाला 20 किलो तांदूळ आणि अन्य मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.









