वृत्तसंस्था/ बटुमी, जॉर्जिया
फिडे महिला विश्व बुद्धिबळ चषक स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने दुसऱ्या फेरीत उझबेकिस्तानच्या अफऊझा खामदामोवासोबत सहज बरोबरी साधली आणि तिची लढत 1.5-0.5 अशा फरकाने जिंकली, तर डी. हरिकाने अंतिम 32 खेळाडूंच्या टप्प्यात प्रवेश करताना भारताच्याच पी. व्ही. नंदीधाचा पराभव केला.
हम्पी पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना सदोदित नियंत्रणात दिसली आणि बरोबरीत सामना सोडवून तिने पुढच्या फेरीसाठी तिची ऊर्जा वाचवून ठेवली. दुसरीकडे, नंदीधाने विजय आवश्यक असलेल्या सामन्यात पूर्ण जोर लावल्यानंतर हरिकाने शैलीत मार्ग काढला. या स्पर्धेत दोनदा कांस्यपदक विजेती ठरलेल्या हरिकाने आपले नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आणि नंदीधा ही किरण मनीषा मोहंतीनंतर स्पर्धेतून बाहेर पडणारी दुसरी भारतीय बनली.
आर. वैशालीनेही कॅनडाच्या ओएलेट मॅली-जेडला हरवून भारताच्या दिवसातील आणखी एका विजयात स्थान मिळवले, तर दिव्या देशमुखने जॉर्जियाच्या केसरिया म्गेलाड्झेला हरवले. पहिल्या फेरीत आश्चर्यचकित करणाऱ्या के. प्रियांकाने चांगली कामगिरी सुरूच ठेवली आणि पोलंडच्या क्लाउडिया कुलोनसोबत सलग दोन बरोबरी साधून टायब्रेकरपर्यंत सामना नेला. वंतिका अग्रवालसाठी मात्र दिवस थोडासा धक्कादायक ठरला. तिने पहिल्या गेममध्ये माजी विश्वविजेत्या युक्रेनच्या अॅना उशेनिनाविऊद्ध सहज विजय मिळवला होता. तथापि, दुसऱ्या गेममध्ये युक्रेनियन खेळाडूने पुनरागमन करून बरोबरी साधली. त्यामुळे आता दोन्ही खेळाडूंना टायब्रेयकर खेळावा लागेल.









