इस्रायलच्या हल्ल्यांमुळे झाली उपरती
वृत्तसंस्था/ गाझा
हमासच्या गाझा प्रमुखाने इस्रायलच्या तुरुंगात कैद पॅलेस्टिनींच्या बदल्यात उर्वरित सर्व ओलिसांची मुक्तता करण्यास तयार असल्याचे आणि याविषयी लवकर चर्चा करू इच्छित असल्याचे म्हटले आहे. हमासला अंतरिम युद्धविराम करार मान्य नाही. क्षेत्रात युद्ध पूर्णपणे थांबायला हवे असे इस्रायलसोबत पडद्याआडून चर्चा करणाऱ्या हमासच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या खलील अल-हय्याने सांगितले आहे.
गाझामध्ये इस्रायलने गुरुवारी रात्री केलेल्या हल्ल्यांमध्ये 23 जण मारले गेले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 10 जणांचा समावेश आहे. याचदरम्यान संयुक्त राष्ट्रसंघाने गाझामध्ये अन्नधान्य, पेयजल आणि औषधांच्या टंचाईमुळे धोकादायक स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे.
इस्रायलने युद्धग्रस्त पॅलेस्टिनी क्षेत्रात 6 आठवड्यांपासून आवश्यक सामग्रीचा पुरवठा रोखला आहे. यामुळे गाझाच्या बहुतांश लोकसंख्येला 24 तासांमध्ये एकवेळचे अन्न मिळत आहे. ओलिसांच्या मुक्ततेसाठी हमासवर दबाव निर्माण करण्यासाठी इस्रायलने युद्धविराम संपुष्टात आत मार्चपासून गाझामध्ये भीषण हल्ले करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
इस्रायलच्या नव्या हल्ल्यात खान यूनिस शहरात एकाच कुटुंबातील 5 मुले, 5 महिला आणि एक पुरुष मारला गेला आहे. हे सर्व जळून होरपळून मृत्युमुखी पडले आहेत. हल्ल्यांपासून सर्वसामान्य नागरिकांना वाचविण्याचा शक्य ते प्रयत्न करत असल्याचा दावा इस्रायलच्या सैन्याने केला आहे. सर्वसामान्य लोकांच्या मृत्यूसाठी हमास जबाबदार आहे, हमासच लोकांदरम्यान राहून इस्रायलच्या सैन्यावर हल्ले करत आहे. अशास्थितीत हमासच्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आल्यास सर्वसामान्य पॅलेस्टिनी नागरिक देखील बळी पडत असल्याचे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे.
लेबनॉन सैन्याकडून एका समुहाला अटक
याचदरम्यान लेबनॉनमधून इस्रायलवर रॉकेट हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या एका समुहाला तेथील सैन्याने ताब्यात घेतले आहे. या समुहाने मार्च महिन्यात इस्रायलवर हल्ला केला होता, यामुळे दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला होता.
रशियन नागरिकांची मुक्तता
हमासकडून फेब्रुवारी महिन्यात मुक्तता करण्यात आलेल्या तीन रशियन नागरिकांनी बुधवारी मॉस्कोमध्ये राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. पुतीन यांनी रशियन नागरिकांच्या मुक्ततेसाठी हमासचे आभार मानले आहेत. या रशियन नागरिकांचे ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने दहशतवादी हल्ल्यांदरम्यान अपहरण केले होते. हे रशियन नागरिक तेव्हापासून हमासच्या कैदेत होते. मुक्तता झालेल्या रशियन नागरिकांमध्ये एलेक्झेंडर ट्रूफानोव आणि त्यांच्या कुटुंबाचे दोन सदस्य आहेत.









