इस्रायलकडून हवाई हल्ला
वृत्तसंस्था/ गाझा
इस्रायलच्या भीषण हवाई हल्ल्यात दक्षिण गाझाच्या खान यूनिसमध्ये हमासच्या वरिष्ठ राजकीय नेत्याचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात सलाह अल-बर्दाविल मारला गेल्याचे हमासकडून रविवारी सांगण्यात आले. गाझावर नियंत्रण असलेल्या हमासच्या राजकीय कार्यालयाचा बर्दाविल हा सदस्य होता. इस्रायलने गाझामध्ये पुन्हा हल्ले सुरू केल्याने युद्धविराम संपुष्टात आला आहे.
हल्ल्यात बर्दाविलची पत्नी देखील ठार झाले आहे. युद्धाचा मुख्य उद्देश हमासला एक सैन्य अन् शासन करणाऱ्या शक्तीच्या स्वरुपात नष्ट करणे आहे. नव्या अभियानाचा उद्देश हमासला उर्वरित ओलिसांची मुक्तता करण्यास भाग पाडणे असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
इस्रायलच्या अलिकडच्या हल्ल्यांमध्ये हमासचे अनेक मोठे नेते मारले गेले आहेत. तर हमासकडून संचालित आरोग्य मंत्रालयाने शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. इस्रायलने मंगळवारी केलेल्या हल्ल्यात हमासच्या सरकारचे प्रमुख एसाम अदलीस आणि अंतर्गत सुरक्षा प्रमुख अबू वत्फाचा मृत्यू झाला होता. याचबरोबर आणखी अनेक अधिकारी मारले गेले होते. इस्रायलने शुक्रवारी केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा सैन्यगुप्तचर प्रमुख ओसामा तबाशचा खात्मा केला होता.
अल-बर्दाविल हा हमासचा वरिष्ठ सदस्य होता. 2021 मध्ये तो हमासच्या पॉलिट ब्युरोसाठी निवडला गेला होता. गाझामध्ये हमासच्या क्षेत्रीय पॉलिट ब्युरोचा तो हिस्सा होता. तसेच हमासचा प्रवक्ता म्हणून त्याने काम पाहिले होते.









