गेल्या शनिवारी ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर भीषण हल्ला चढवून स्वत:च्या पायावरच नुसता नव्हे, तर शिरावर धोंडा पाडून घेतला आहे. हा हल्ला केवळ न्याय्य अधिकारांसाठी होता, असे मानणे ही आत्मवंचना आहे. कारण या हल्ल्यात निरपराध इस्रायली महिलांवर जे अनन्वित अत्याचार करण्यात आले, ज्या प्रकारे त्यांची विवस्त्र धिंड काढण्याचे प्रकार घडले, तसेच ज्या प्रकारे लहान बालकांचे शिरच्छेद करुन आणि त्यांना यातना देऊन या जगातून नाहीसे करण्यात आले, ते पाहता हमासने स्वत:चीच कबर खोदून घेतली आहे, असे म्हणता येते. कारण, या घटनांमुळे इस्रायलला साऱ्या जगाची सहानुभूती मिळत आहे. शिवाय त्या देशातील सारे पक्ष राजकीय मतभेद विसरुन एकत्र झाले आहेत. असा हल्ला झाल्यानंतर सरकार चालविणाऱ्या नेत्यांचे राजीनामे मागण्याचे हस्यास्पद प्रकार तर सोडाच, पण तेथील प्रत्यक्ष विरोधी पक्षनेत्याने स्वत: हातात शस्त्र धरुन शत्रूचा नायनाट करण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी प्रमुख विरोधी पक्षांसह राष्ट्रीय सरकार स्थापन केले असून हमासचा नायनाट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या युद्धकक्षात विरोधी पक्षनेत्यांनाही मानाचे स्थान दिले आहे. भारतातील विरोधी पक्ष नेत्यांनी आणि त्यांची तळी उचलणाऱ्या कथित पुरोगाम्यांनी यावरुन काही शिकावयास हरकत नाही. पण तसे होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे भलतीच अपेक्षा करण्यात अर्थ नाही. भारताने या प्रसंगी इस्रायलला पाठिंबा व्यक्त केला, हे योग्यच झाले. इस्रायलच्या या हल्ल्यामुळे एक लाभ मात्र निश्चितच झाला. भारतातील काही कथित पुरोगाम्यांना आनंदाचे भरते आले. अलीकडच्या काही वर्षांमध्ये, विशेषत: मे 2014 पासून त्यांच्या नशीबी पुष्कळसा अपेक्षाभंग आणि उपेक्षाच आलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हमासचा हल्ला ही क्षणिक का असेना, पण सुखाची बाब होती. हा आनंद त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आणि बेभान होऊन आपल्या लेखनातून किंवा मिळेल त्या साधनांद्वारे व्यक्तही केला. इस्रालयची कशी जिरली, याची त्यांनी लिहिलेली रसभरित वर्णने त्यांची बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करणारी आहेत. तेव्हा अशा प्रकारच्या पुरोगाम्यांचा भावनात्मक लाभ या हल्ल्यामुळे झाला हे मान्यच करावे लागते. यापेक्षा या हल्ल्यातून अधिक काही साध्य होईल आणि ज्या पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याचे तसेच इस्रायलचा आणि तेथील ज्यू समाजाचा सर्वनाश करण्याचे जे स्वप्न काही दहशतवादी संघटनांना पडत आहे, ते मात्र या हल्ल्यामुळे पूर्वी होते त्यापेक्षाही धूसर झाले आहे. कारण या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी जी कृत्ये केली ती मानवतेला काळीमा फासणारी आहेत, असे म्हणणे फारच सौम्य ठरावे, इतकी ती भयानक आहेत. या हल्ल्याचे समर्थन जो कोणी, ज्या कुठल्या कारणासाठी करीत असेल तो या कृत्यांचेही कळत न कळत समर्थनच करतो, असे मानले गेले, तर ते योग्यच म्हटले पाहिजे. या कृत्यांमुळे आता हमास आणि त्यायोगे पॅलेस्टाईन यांच्या विरोधात निर्णायक कृती करण्याचे सबळ कारण इस्रायलला मिळाले आहे. आता इस्रायलने या दहशतवादी संघटनांविरोधात कितीही मोठी आणि कितीही विनाशकारी कारवाई केली, तरी त्या देशाला दोष देता येणार नाही. आजवर पॅलेस्टाईनच्या कारणासाठी इस्रायल आणि त्याच्या अवतीभोवतीचे अरब देश यांच्यात अनेकदा मोठी युद्धे झाली आहेत. पण कोणत्याही युद्धात महिलांवर इतके आणि अशा प्रकारचे अत्याचार झाल्याचे ऐकिवात नाही. यावेळी ते घडले आहे. त्यामुळे आता हा इस्रायल आणि त्याचे समर्थक देश यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला असून जर त्यांनी निर्णायक कारवाई केली नाही, तर त्यांची आजवर कमावलेली ख्याती धुळीला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, तसे होऊ दिले जाणार नाही, हे ही तितकेच खरे आहे. ही परिस्थिती हमासच्या आततायीपणामुळे निर्माण झालेली आहे. आजवर दहशतवादाच्या मार्गाने जगातील एकही प्रश्न सुटलेला नाही. उलट जे प्रश्न सन्मान्य आणि सनदशीर मार्गाने सुटले असते, ते दहशतवादाच्या मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न केल्याने अधिक जटील झाले असून ते सुटण्याचे मार्गच बंद झाले आहेत. हमासच्या या हल्ल्यामुळे नेमके हेच घडले असून आता पॅलेस्टाईनचे स्वातंत्र्य विसरा, असे इस्रायलने स्पष्टपणे ठणकाविले तरी ते नैतिक मानले जाईल. या किंवा अशा कितीही हल्ल्यामुळे इस्रायल नष्ट होणार नाही. उलट तो अधिक एकसंध, अधिक सामर्थ्यसंपन्न आणि अधिक आक्रमकही होईल. त्याला तसे होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाहीत. इस्रायलच्या पॅलेस्टाईन धोरणावर टीका करणारे इस्रायलमधील आवाजही या हल्ल्यामुळे आणि त्यात झालेल्या संतापजनक अत्याचारांमुळे क्षीण होतील. मग यातून पॅलेस्टाईनचा कोणता लाभ होईल? याचा विचार भारतातील पुरोगाम्यांनीही आनंदोत्सवातून त्यांना थोडी सवड मिळेल तेव्हा करावयास हरकत नाही. काही तात्विक प्रश्नही काही पुरोगामी निर्माण करतात. इस्रायलची स्थापना पॅलेस्टाईनच्या भूमीवर बळाने करण्यात आली आहे, त्यामुळे या भूमीवर इस्रायलचा अधिकार नाही, असे त्यांचे साळसूद म्हणणे असते. या लोकांना एकतर इतिहास माहिती नाही, किंवा ते लोकांची दिशाभूल करीत आहेत. कारण दोन हजार वर्षांपूर्वी आजचा इस्रायल ही ज्यू लोकांचीच भूमी होती. विविध परकीय आक्रमकांनी त्यांना तेथून हुसकावले आणि ती बळाने ताब्यात घेतली. या भूमीवर शेवटचा ताबा मिळविणारे परकीय आक्रमक अरब हे आहेत. या सर्व घटनाक्रमाचे ठसठशीत पुरावेही आहेत. असे पुरावे असताना या भूमीवर ज्यू लोकांचा अधिकारच नाही, असे कसे म्हणता येईल? राहता राहिला प्रश्न अरब आणि ज्यू यांनी एकत्र राहण्याचा. तो कदाचित कालांतराने सुटलाही असता. पण हमासने क्रौर्याचा कळस गाठून तो मार्ग जवळपास कायमचा बंद केला आहे. आता जे होईल, त्याला ही दहशतवादी संघटनाच जबाबदार असेल, हे आपल्या तथाकथित विचारवंतांनीही लक्षात घ्यावे. पण ही अपेक्षा पालथ्या घड्यावर पाणी, अशी आहे.
Previous Articleकव्हर ड्राईव्ह : दिल्लीत टीम इंडियाची दबंगगिरी
Next Article तीरथ अर्थपूर्ण ज्येष्ठत्वाकडे…
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








