अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी केली शक्यता व्यक्त
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
भारत आणि युरोप यांच्यात आर्थिक कॉरिडॉर निर्माण केला जाणार आहे. याची घोषणा भारतात झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या काळात करण्यात आली होती. हा कॉरिडॉर मध्यपूर्वेतून इस्रायलच्या मार्गे जाणार होता. या कॉरिडॉरला रोखण्यासाठी हमासने इस्रायलवर हल्ला केल्याची शक्यता आहे, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी केले आहे. ही शंका यापूर्वीच अनेक तज्ञांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे एक कारण हा कॉरिडॉर हे असू शकते. मात्र, हे केवळ आपले मत आहे. याचा कोणताही पुरावा आपल्याकडे नाही. तथापि, हा कॉरिडॉर होऊ नये अशी अनेकांची इच्छा होती. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी हा हल्ला केलेला असू शकतो, अशा अर्थाचे विधान त्यांनी केले.
युद्धाला 20 दिवस पूर्ण
इस्रायल-हमास युद्धाला आता 20 दिवस पूर्ण झाले आहेत. हमासने 7 ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात 1,400 हून अधिक इस्रायली नागरिक आणि अन्य देशांचे नागरिक मारले गेले होते. त्यानंतर इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात 6 हजारांहून अधिक पॅलेस्टाईनी मारले गेले आहेत. हमासचे 1,000 हून अधिक दहशतवादी मारल्याचा दावाही इस्रायलने केला आहे. सध्या हे युद्ध गाझापट्टी, वेस्ट बँक आणि लेबेनॉनची सीमारेषा अशा तीन आघाड्यांवर होत आहे.
इस्रायलचे हल्ले सुरुच
हमास ही दहशतवादी संघटना पूर्णत: नष्ट करण्याचा निर्धार इस्रायलने व्यक्त केला आहे. तसेच हिजबुल्ला या संघटनेलाही नष्ट करण्याचा इशारा दिला आहे. आतापर्यंत इस्रायलने केलेल्या वायुहल्ल्यांमध्ये गाझापट्टीतील हमासची हजारो ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. तसेच वेस्ट बँक आणि लेबेनॉनमध्येही इस्रायलची जोरदार कारवाई होत आहे. तेथे हिजबुल्लाचे अनेक कमांडर मारले गेले आहेत. तसेच सिरीयामधील अनेक लष्करी आस्थापने नष्ट झाली आहेत.
सिरीया लेबेनॉन आघाडी शांत
गुरुवारी इस्रायलच्या उत्तरकडे असणाऱ्या लेबेनॉन आणि सिरीया आघाडीवर तुलनेने शांतता होती. इस्रायलवर तेथून कोणताही अग्निबाण मारा झाला नाहे. तसेच इस्रायलनेही मोठे वायुहल्ले केले नाहीत. गाझापट्टीवर मात्र इस्रायलने हमासच्या विरोधातील हल्ले सुरुच ठेवले असून तेथे गेल्या चोवीस तासांमध्ये 100 हून अधिक लोक मारले गेल्याचा दावा पॅलेस्टाईनकडून करण्यात आला आहे.
गाझापट्टीवर आक्रमणाची योजना लांबणीवर
गाझापट्टीत सैनिक पाठवून हमासचा कायमचा बंदोबस्त करण्याची योजना इस्रायलने आखली आहे. तथापि, तसे झाल्यास इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिका इस्रायलला अत्याधुनिक क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा पुरविणार आहे. ही यंत्रणा लवकरात लवकर नियुक्त केली जाणार आहे. त्यानंतर इस्रायल गाझापट्टीत प्रवेश करेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
इस्रायलची गाझात छोटी कारवाई
गुरुवारी सकाळी इस्रायलने गाझापट्टीत रणगाडे आणि सैनिक पाठवून मर्यादित प्रमाणात कारवाई केली आहे. या कारवाईत हमासच्या अनेक तळांना लक्ष्य करण्यात आले होते. तसेच हमासचे काही दहशतवादी मारले गेल्याचा दावाही करण्यात आला आहे. इस्रायलचे सैनिक आणि रणगाडे ही कारवाई आटोपताच सुखरुप आपल्या देशात परतल्याचे वृत्तही देण्यात आले आहे. अशी कारवाई इस्रायलने दोन दिवसांपूर्वीही केली होती. तथापि, अमेरिकेची क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतरच इस्रायल गाझापट्टीत व्यापक आणि मोठी कारवाई करणार आहे.
गुरुवारी दिवसभरात…
- इस्रायलची गाझापट्टीत मर्यादित प्रमाणात सैनिक कारवाई
- अमेरिका इस्रायलला पुरविणार क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा
- ही यंत्रणा मिळाल्यानंतर गाझात व्यापक कारवाई करणार









