इस्रायलसोबतचा संघर्ष मिटण्याचे संकेत : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अल्टिमेटमचा परिणाम
► वृत्तसंस्था/ गाझा सिटी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर सहा तासांनी हमासने गाझामध्ये युद्धबंदीला सहमती दर्शविली आहे. ट्रम्प यांच्या योजनेत नमूद केलेल्या प्रस्तावानुसार हमासने शुक्रवारी रात्री सर्व मृत आणि जिवंत कैद्यांना सोडण्यास तयार असल्याची घोषणा केली. तसेच गाझावरील नियंत्रण सोडण्यास देखील तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. हमासच्या घोषणेनंतर ट्रम्प यांनी इस्रायलला गाझामध्ये त्वरित हल्ले थांबवण्यास सांगितले आहे. दरम्यान, इस्रायलने ट्रम्पच्या गाझा योजनेची अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शविली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी गेल्या आठवड्यात सल्लामसलत करून विकसित केलेली गाझामधील इस्रायल-हमास युद्ध संपवण्यासाठी 20 कलमी शांतता योजना सादर केली आहे. इस्रायल आणि हमास दोघांनीही या मुद्यांशी सहमती दर्शविली तर युद्ध संपण्याची आशा आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मकता दर्शवली असली तरी हमासकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, ट्रम्प यांनी दिलेल्या रविवारपर्यंतच्या अल्टिमेटमनंतर हमासने बऱ्याच मुद्यांवर सकारात्मकता दर्शवल्याचे समजते. आता सर्व प्रस्ताव मान्य झाल्यानंतरच द्विपक्षीय संघर्ष थांबण्याची चिन्हे आहेत. जर दोन्ही बाजू सहमत झाल्या तर इस्रायली सैन्य गाझामधून माघार घेईल आणि सर्व लढाई थांबतील. इस्रायली सैन्य हळूहळू माघार घेईल. मात्र, अजूनही ओलिसांना सोडण्यास हमास तयार होण्याची प्रतीक्षा आहे. गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेल्या 20-कलमी शांतता कराराच्या काही पैलूंवर वाटाघाटी आवश्यक आहेत.
इस्रायल युद्धबंदीला सहमत
पंतप्रधान नेतान्याहू यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. इस्रायल ट्रम्पच्या योजनेचा पहिला टप्पा अंमलात आणण्यास तयार आहे. यासाठी, ते युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प आणि त्यांच्या शिष्टमंडळासोबत जवळून काम करतील. इस्रायलने गाझामधील आक्रमण थांबवण्यासही सहमती दर्शविली आहे. सरकारने गाझामधील त्यांच्या ताब्यातील कारवाया थांबवण्याचे आदेश लष्कराला दिल्याचे सांगून आवश्यकतेनुसारच कारवाई करावी, असे सुचविले आहे.
हमास 48 ओलिसांना सोडण्यास तयार
हमास सर्व 48 ओलिसांना सोडण्यास तयार आहे. त्यापैकी 20 जिवंत असल्याचा दावा केला जात आहे. युद्धबंदी लागू झाल्यानंतर 72 तासांच्या आत ओलिसांना सोडण्यात येईल, त्या बदल्यात 2000 हून अधिक पॅलेस्टिनी सुरक्षा कैदी आणि मृत गाझावासीयांचे मृतदेह परत करण्यात येतील. यानंतर, इस्रायल गाझामधून माघारीचा पहिला टप्पा पूर्ण करेल. आवश्यक अटी पूर्ण झाल्यावरच ओलिसांना सोडण्यात येईल. तथापि, हमासने या अटींबद्दल अधिक तपशील उघड केलेला नाही.
ट्रम्प यांच्याकडून व्हिडिओ जारी
हमासच्या घोषणेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. सदर व्हिडिओमध्ये या दिवसाला ‘खूप खास’ म्हटले आहे. अनेक मुद्दे सोडवायचे आहेत. ओलिस लवकरात लवकर घरी परतण्याची वाट पाहत आहेत. त्यांना शक्य तितक्या लवकर त्यांच्या पालकांकडे परत यायचे आहे, असे ट्रम्प यांनी पुढे स्पष्ट केले.









