काही इस्रायली ओलिसांची मुक्तता करणार : नेतान्याहू यांच्या अटीची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ गाझा
हमासने गाझामध्ये युद्धविराम आणि इस्रायली ओलिसांच्या मुक्ततेच्या करारावर सहमती दर्शविली आहे. अमेरिका, इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थीनंतर हा प्रस्ताव अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव विटकॉफ यांनी मांडला होता. याच्या अंतर्गत प्रारंभिक 60 दिवसांमध्ये हमास जिवंत असलेल्या इस्रायली ओलिसांची दोन टप्प्यांमध्ये मुक्तता करेल, तसेच स्थायी शस्त्रसंधीवरही चर्चा होणार आहे. परंतु या प्रस्तावाबद्दल इस्रायलने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
यापूर्वी 12 ऑगस्ट रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी सर्व ओलिसांची एकाचवेळी मुक्तता करण्यात आली तरच कुठलाही करार स्वीकारला जाणार असल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे इस्रायलमध्ये लोकांनी निदर्शने करत हमाससोबत करार करून गाझामधील संघर्ष संपुष्टात आणण्याची आणि ओलिसांची मुक्तता करविण्याची मागणी केली आहे. या निदर्शकांनी रस्त्यांवरील वाहतूक रोखत जाळपोळ केली आहे.
गाझावरील कब्जाला मंजुरी
इस्रायलच्या मंत्रिमंडळाने 8 ऑगस्ट रोजी गाझासिटीवरील कब्जाच्या योजनेला मंजुरी दिली होती. तसेच नेतान्याहू यांनी गाझाच्या सर्व हिस्स्यांवर कब्जा करणे आणि त्याला शस्त्रास्त्ररहित करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे हमासने सर्व ओलिसांच्या मुक्ततेच्या बदल्यात इस्रायली तुरुंगात कैद पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता, युद्धसमाप्ती आणि इस्रायली सैन्याच्या पूर्ण माघारीची मागणी केली आहे.
हमासने शस्त्रs खाली ठेवावीत
यापूर्वी हमासने कतार आणि इजिप्तचा प्रस्ताव फेटाळला होता. हमास आणि इस्रायल दरम्यान इस्रायली सैनिकांची वापसी, गाझामधील मदतवितरण आणि स्थायी युद्धविराम यासारख्या मुद्द्यांवर तीव्र मतभेद आहेत. इस्रायलने हमासने शस्त्रास्त्रs खाली ठेवावीत आणि गाझामधील त्याच्या शासनाला समाप्त करण्यावर जोर दिला आहे. तर हमासने पॅलेस्टिनी देशाच्या मान्यतेची मागणी केली आहे.
75 टक्के भूभागावर इस्रायलचे नियंत्रण
गाझा शहरात घुसून हमासच्या कब्जात असलेल्या ओलिसांची मुक्तता करण्याची योजना इस्रायलची असल्याचे मानले जात आहे. या भागात इस्रायलच्या सैन्याने आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर कारवाई केलेली नाही. गाझाच्या सुमारे 75 टक्के हिस्स्यावर आता इस्रायलच्या सैन्याचे नियंत्रण आहे. तर गाझापट्टीचा 25 टक्के भाग इस्रायलच्या कब्जात नाही.









