राजापूर :
तालुक्यातील जामदा प्रकल्प बाधित ग्रामस्थांच्या पुनर्वसनाबाबत पुनर्वसन अधिकारी, कार्यकारी अभियंता व पुनर्वसन तज्ञ यांची काजिर्डा गाव पातळीवर संयुक्त बैठक येत्या 15 दिवसांत होणार असून तोपर्यंत भूसंपादनाचे काम थांबवावे, अशा सूचना आमदार किरण सामंत यांनी दिल्या आहेत.
राजापूर तालुक्यातील जामदा प्रकल्पबाधित क्षेत्रातील जमीनी खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीची प्रक्रिया सुरू असून याबाबत काजिर्डा ग्रामपंचायतीने प्रांताधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे आक्षेप नोंदविला आहे. यामध्ये काजिर्डा कार्यक्षेत्रातील जामदा प्रकल्प बुडीत क्षेत्रातील राणेवाडी महसूल गावातील काही शेतकऱ्यांच्या खासगी वाटघाटीच्या प्रक्रियेच्या हालचाली शासन स्तरावरून सुरू झाल्या असल्याचे समजते, परंतु पाटबंधारे विभाग चिपळूण यांचेमार्फत पुनर्वसन गावठाणाचे नियोजन गावापातळीवर सुरू आहे. याबाबत 28 फेब्रुवारी रोजी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग चिपळूण व अन्य जबाबदार अधिकारी यांचेसह ग्रामस्थ्यांच्या बैठकीतील नियोजनानुसार संकलन रजिस्टर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
अशा स्थितीत खासगी क्षेत्रातील जमीन खासगी वाटघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया अवलंबण्यात येत असल्याचे समजते. यामुळे पुनर्वसन गावठाण निश्चितीच्या व त्यासाठीच्या राणेवाडी व काजिर्डा गावातील माहिती संकलनाच्या कामावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सद्यस्थितीत खासगी वाटाघाटीची सुरू केलेली प्रक्रिया गावठाण निश्चिती व संकलनाचे काम पूर्ण होईपर्यंत थांबविण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली होती.
या पार्श्वभूमीवर काजिर्डा ग्रामस्थांची आमदार किरण सामंत यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांनी भूसंपादन प्रक्रीयेबाबत असलेल्या तक्रारी मांडतानाच कार्जिडा व राणेवाडी येथील बाधित कुटुंबांचे नियमाप्रमाणे विशेष भूसंपादन अधिकारी नेमूण अहवाल तयार करावा, अशी मागणी केली. यावर आ. सामंत यांनी येत्या पंधरा दिवसांमध्ये आपण पुनर्वसन अधिकारी, कार्यकारी अभियंता व पुनर्वसन तज्ञ यांची कार्जिडा गावपातळीवर संयुक्त बैठक घेणार असल्याचे सांगितले. ही बैठक होईपर्यंत भूसंपादनाचे काम थांबविण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.








