नागरिकांतून समाधान : पावसाळ्यानंतर संपूर्ण रस्त्याचे काम हाती घेणार
खानापूर : हलशी-नागरगाळी रस्त्याचे काम गेल्या चारवर्षापासून सुरू आहे. हलशी ते हलगा हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले असून पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावर पाणी साचून डबक्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, म्हणून हलगा ग्रा. पं. चे सदस्य रणजीत पाटील आणि हलगा परिसरातील नागरिकांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली आहे. सध्या खडी टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात येणार आहे.
रस्त्याच्या डागडुजीच्या कामाला सुरवात झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हलशी-हलगा रस्ता पूर्णपणे उदध्वस्त झालेला होता. वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यास कंत्राटदाराला भाग पाडले आहे. त्यामुळे कंत्राटदाराने गुरुवारी सकाळपासून खडी टाकून रस्ते बुजविण्याच्या कामास सुरवात केली आहे. ऑक्टोबरपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करून देण्यात येणार आहे. पावसाळा संपल्यानंतर संपूर्ण रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी संजय गस्ती यांनी सांगितले.









