20 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त : पाच घरफोड्या केल्याची कबुली
बेळगाव : बेळगाव व धारवाड जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या हलशी (ता. खानापूर) येथील एका तरुणाला कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून 20 लाख 30 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. महादेव नारायण धामणेकर (वय 26, रा. हलशी) असे त्याचे नाव आहे. बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूरचे मंडल पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, प्रवीण कोटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
विद्यानगर एम. के. हुबळी येथे गेल्या महिन्यात चोरीची घटना घडली होती. 19 मे 2025 रोजी कल्लाप्पा शंकऱ्याप्पा करवीनकोप्प यांनी कित्तूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती.19 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12.30 यावेळेत आपल्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व 6500 रुपये रोकड पळविल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते.
या प्रकरणाचा तपास करताना कित्तूर पोलिसांनी महादेव धामणेकर या तरुणाला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता एका कित्तूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात तीन व धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दोन अशा एकूण पाच घरफोड्या केल्याची त्याने कबुली दिली. बहुतेक घटना दोन वर्षांपूर्वी घडल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याजवळून 20 लाख 30 हजार रुपये किमतीचे 200 ग्रॅम सोने, 270 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत.









