एकच वेळ बसफेरी सुरू : दिवसातून चार फेऱ्यांची मागणी कायम
वार्ताहर/किणये
हलगा गाव बस सेवेपासून वंचित होते. या गावाला एकही स्वतंत्र बस फेरी नव्हती. अन्य गावाहून येणाऱ्या बस हलगा बस थांब्याजवळ थांबत नव्हत्या. यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत बसावे लागत होते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. संतापलेल्या विद्यार्थी व ग्रामस्थांनी अखेर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. त्यामुळे परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी हलगा गावाला सध्या एक बस फेरी सुरू केली आहे. पण ती अपुरी असल्याने दिवसातून किमान चार वेळा तरी स्वतंत्र बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी वर्गांची कायम आहे. गावातून रोज 200 ते 250 विद्यार्थी हायस्कूल, कॉलेजला बेळगावला येतात. मात्र गावासाठी स्वतंत्र बस नसल्याने सर्वांचीच गैरसोय होत होती. अन्य गावाहून येणारी बस थांबत नाही. त्यामुळे शाळा कॉलेजला जायचे कसे? याची चिंता विद्यार्थ्यांना लागली होती.
बस नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती पालक वर्गाने दिली. बस्तवाड, मास्तमर्डी, चंदनहोसूर, तारिहाळ, के. के. कोप, मरकट्टी, नागेनहटी, कोंडुस्कोप या गावातील बस हलगा गावाहून जातात. मात्र या बस अगोदरच प्रवाशांनी भरून येतात. यामुळे चालक व वाहक हलगा बस थांब्याजवळ बस न थांबवताच जात आहेत, अशा तक्रारी गेल्या काही वर्षापासून वाढलेल्या आहेत. ग्रामपंचायतीच्यावतीने अनेक वेळा राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले होते. तरीही अधिकाऱ्यांनी बस सेवेकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकही बेळगावला विविध कामांसाठी येतात. त्यांनाही बस नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. शनिवार दि. 20 रोजी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे आवाहन ग्रामपंचायत व विद्यार्थी आणि पालक वर्गाने केले होते. यामुळे परिवहन अधिकाऱ्यांना जाग आली आणि गावाला स्वतंत्र बस फेरी सुरू केली आहे.
बसफेऱ्या वाढविण्याची मागणी
सकाळी साडेसात वा. येणाऱ्या बस बस फेरीचे स्वागत ग्रामस्थांतर्फे केले. परंतु सकाळी साडे आठनंतर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सकाळी साडेआठ, सायंकाळी चार व पाच वाजता अशा बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.









