बससेवेचा बोजवारा : गावाला एकही बस नसल्याने गैरसोय : परिवहन मंडळाचे दुर्लक्ष
वार्ताहर/किणये
तालुक्यातील सुवर्ण विधानसौध जवळ असलेले हलगा गाव बससेवेपासून वंचित आहे. सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला एकही स्वतंत्र बसफेरी नाही. याचा त्रास गावातील शालेय विद्यार्थी व प्रवासी वर्गाला होत आहे. अन्य गावाहून येणाऱ्या बस हलगा बस थांब्याजवळ थांबत नाहीत. यामुळे गावातील विद्यार्थ्यांना तासन्तास बस थांब्यावर ताटकळत बसावे लागत आहे. अनेक वेळा परिवहन मंडळाला निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी विद्यार्थी वर्गातून होत आहेत.
तेथील विद्यार्थी दररोज बालवाडी, शाळा, हायस्कूल, कॉलेज व पदवी शिक्षणासाठी बेळगावला येतात. मात्र गावात येणाऱ्या अन्य गावातील बसेस आधीच प्रवाशांनी भरून येतात अन्य बऱ्याच वेळा वाहक व चालक या ठिकाणी बस थांबवत नाहीत. यामुळे या गावातील विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला वेळेवर पोहोचता येत नाही त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती पालक वर्गातून देण्यात आली.
बस्तवाड, मास्तमर्डी, चंदन होसूर, तारिहाळ, के. के. कोप, मरकट्टी, नागेनहट्टी, कोंडुस्कोप या गावातील बस हलगा मार्गेच ये-जा करतात. मात्र त्या बसेस आधीच प्रवाशांनी भरलेल्या असल्यामुळे गावातील विद्यार्थी व प्रवाशांना बसमध्ये जागाच मिळत नाही. अनेक वेळा तर विद्यार्थ्यांना बसच्या पायरीवरच थांबून जावे लागत आहे. पण, जर मोठा अनर्थ घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. तसेच बेळगावला विविध कामांसाठी व बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे.
अन्यथा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना हलगा गावात स्वतंत्र बस सुरू करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सदस्यांनी दिले आहे. मात्र याचीही दखल परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. अखेर संतप्त झालेले प्रवासी व विद्यार्थी आणि ग्रामपंचायत सदस्यांतर्फे शनिवार दि. 20 रोजी हलगा गावाला बस फेरी सुरू करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. आरटीओ सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती सदानंद बिळगोजे यांनी दिली आहे.









