रस्त्यावर खड्डेच खड्डे, झाडाझुडपांमुळे वाहनांना धोका
वार्ताहर /खानापूर
हलगा गावापासून नागरगाळीपर्यंतच्या सुमारे 11 किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवाय रस्त्याच्या बाजूला मोठ्या चरी पडल्या आहेत. या भागात घनदाट जंगल असल्याने पाऊस मोठा होतो. त्यामुळे पावसाळ्यात खड्डेयांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूची झुडपे वाढली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणच्या वळणावर समोरून येणारे वाहनही दिसत नाही. त्यामुळे अपघात घडत आहेत. वाढत्या जंगलामुळे वन्यप्राण्यांची संख्याही वाढली आहे. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी रस्त्यावर येतात. खड्डेयांमुळे वन्यप्राण्यांना चुकवून वाहन चालवणे वाहनधारकांना आव्हानात्मक बनते. नंदगडपासून दांडेलीला जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यातच या भागातील कुंभार्डा येथे नाथपंथीय हंडीभडंगनाथ मठ असल्याने या रस्त्यावरून येणार जाणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे. या रस्त्यावरून दांडेलीला लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी संख्या वाढली आहे. त्यामुळे खड्डेयांत दिवसेंदिवस वाढच होत आहे. या रस्त्याची दुऊस्ती व्हावी म्हणून या भागातील जनतेने अनेकवेळा आवाज उठवला आहे.









