शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा : हलगानजीक सुरू होते काम, शेतकरी-कामगारांमध्ये वादावादी
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बंद पाडून यंत्रसामुग्रीसह कामगारांना माघारी धाडले. हलगा ते धामणे रोड दरम्यान सुरू असलेल्या कामाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. यामुळे शेतकरी व कामगारांमध्ये वादावादी झाली. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर कामगारांना माघारी फिरावे लागले. पावसामुळे मागील चार माहिन्यांपासून हलगा-मच्छे बायपासचे काम ठप्प होते. मध्यंतरी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे काँक्रीटचे पाईप घालण्याचा प्रयत्न कंत्राटदाराकडून करण्यात आला. परंतु चिखल असल्यामुळे पाईप घालता आले नाहीत. शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाल्याने पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु शेतकऱ्यांनी याला तीव्र आक्षेप घेत काम बंद पाडले.
निकाल लागल्यानंतरच काम करा
बायपासमध्ये शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. झिरो पॉईंट निश्चित करण्याचा खटला तसेच मनाई आदेश असतानाही रात्रंदिवस रस्त्याचे काम करण्यात आल्याबद्दल शेतकरी न्यायालयात गेले आहेत. याचा निकाल लागल्यानंतरच कामाला सुरुवात करा, असे सांगून जेसीबीसह कर्मचाऱ्यांना हुसकावून लावण्यात आले.
यंत्रसामुग्री पाठविली माघारी
हलगा-मच्छे बायपास रस्त्याविरोधात शेतकरी न्यायालयात गेले आहेत. अद्याप न्यायालयाचा निकाल आला नसतानाही शुक्रवारी हलगा गावानजीक कामाला सुरुवात करण्यात आली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना अडवून यंत्रसामुग्री माघारी पाठविली.
– सुरेश मऱ्याकाचे (शेतकरी, हलगा)









