वर्क ऑर्डर दाखविण्याची शेतकऱ्यांची मागणी : ठेकेदाराला धरले धारेवर
बेळगाव : वर्क ऑर्डर दाखविण्याची मागणी करत संतप्त शेतकऱ्यांनी हलगा-मच्छे बायपासचे काम रविवार दि. 12 रोजी पुन्हा बंद पाडले. वर्क ऑर्डरसह किती व कोणत्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे. हे आधी स्पष्ट करा, असे म्हणत शेतकऱ्यांनी ठेकेदाराला धारेवर धरले. हलगा-मच्छे बायपासचे काम शेतकऱ्यांना अंधारात ठेवत केले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, भूसंपादन अधिकारी त्याचबरोबर ठेकेदाराकडे काम सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून कागदपत्रे देण्याची मागणी केली जात आहे. पण कागदपत्रे देण्याऐवजी केवळ वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू आहे. झिरो पॉईंट निश्चित होत नाही तोपर्यंत बायपासचे काम करण्यात येऊ नये. त्याचबरोबर मूळ दाव्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत काम जैसे थे ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. पण शेतकऱ्यांचा विरोध पायदळी तुडवून रस्त्याचे काम सुरूच आहे.
रस्त्याचे काम करत असताना आधी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देणे गरजेचे आहे पण कोणत्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. रस्त्याचे काम करताना वर्कऑर्डर मिळणे जरुरीचे आहे. त्यामुळे वर्क ऑर्डर दाखविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून सुरू आहे. गेल्या महिन्याभरात चारवेळा बायपासचे काम बंद पाडण्यात आले. मात्र पोलीस बळाचा वापर करत रस्त्याचे काम सुरूच आहे. रविवारी शेतकऱ्यांनी पुन्हा बायपासकडे धाव घेतली. त्यावेळी ठेकेदाराने काम सुरू ठेवले होते. संतप्त शेतकऱ्यांनी ठेकेदाराला धारेवर धरत वर्क ऑर्डर दाखविण्याची मागणी केली. पण वर्क ऑर्डर दाखविण्याऐवजी आपल्याला मिळालेल्या कामाची ऑर्डर ठेकेदाराकडून दाखविण्यात येत होती. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. यापुढे आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतरच बायपासचे काम सुरू करण्यात यावे, असा इशारा यावेळी देण्यात आला.









