ठेकेदाराला जाब विचारत यंत्रे धाडली माघारी : शेतकरी झाले आक्रमक : दाव्याचा निकाल लागेपर्यंत कोणतेच काम न करण्याचा इशारा
बेळगाव : हलगा-मच्छे बायपासचे काम संतप्त शेतकऱ्यांनी रविवार दि. 15 रोजी पुन्हा एकदा बंद पाडले. जोपर्यंत दाव्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत कोणतेच काम करण्यात येऊ नये, असे संतप्त शेतकऱ्यांनी ठेकेदाराला सुनावत काम बंद करून यंत्रे हलविण्यास सांगितली. त्यामुळे आता पुन्हा एकदा हलगा-मच्छे बायपासचा वाद चिघळण्याची चिन्हे दिसून येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हलगा-मच्छे बायपासचा वाद सुरू आहे. रस्त्यासाठी पिकाऊ जमीन देणार नाही, असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांचा विरोध पायदळी तुडवला जात आहे. मुख्य दाव्याची सुनावणी सुरू असली तरी तोपर्यंत या रस्त्याचा वापर करण्यात येऊ नये, असा अर्ज शेतकऱ्यांनी सातवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला होता. पण सदर अर्ज फेटाळताना झिरो पॉईंट निश्चित करण्याचा अधिकार न्यायालयाला असल्याचे आदेशात नमूद केले आहे. या आधारावर शेतकरी वरिष्ठ दिवाणी न्यायालयात धाव घेऊन दाद मागणार आहेत. मात्र, तोपर्यंत रस्त्याचे काम करण्यात येऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
विरोध डावलून कामाला सुरुवात
पण शेतकऱ्यांचा विरोध डावलत ठेकेदाराकडून रस्त्याचे काम केले जात आहे. यापूर्वी येळ्ळूर रोडवर आंदोलन करण्यात आले होते, त्यावेळी महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराकडे झिरो पॉईंट निश्चित झालेले पुरावे आणि वर्कऑर्डर काम सुरू असलेल्या बायपासमधील किती शेतकऱ्यांनी भरपाई घेतली आहे, काम सुरू करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या न्यायालयाची आदेशप्रत दाखवा, अशी मागणी केली होती. त्यावेळी दोन दिवसांत कागदपत्रे दिली जातील, असे आश्वासन देण्यात आल्याने त्यावेळी आंदोलन मागे घेण्यात आले होते.
कागदपत्रे न देताच कामाला प्रारंभ
तेव्हापासून अद्यापपर्यंत कोणतीच कागदपत्रे न देता ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे रविवारी संतप्त शेतकऱ्यांनी ठेकेदाराला जाब विचारला. आम्ही या दाव्यातील शेतकरी असून दाव्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत आमच्या जमिनीत कोणतेच काम करायचे नाही. तसेच ज्यांनी भरपाई घेतली नाही त्यांच्या जमिनीतही काम न करण्याबाबत ठणकावले. सध्या नियोजित बायपासवर मातीचा भराव टाकून रुंदीकरण केले जात आहे. अर्ज फेटाळताना या खटल्यात साक्षीपुरावे, युक्तिवाद, सर्वांचे म्हणणे ऐकल्याशिवाय झिरो पॉईंट निश्चित करता येत नाही, अशी महत्त्वाची टिप्पणी न्यायालयाने केल्याने या आदेशाची पहिल्यांदा शहानिशा करा, असे सांगितले. दाव्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीत काम करणार नाही, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात काम सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी. ज्या शेतकऱ्यांनी भरपाई घेतलेली नाही, त्या शेतकऱ्यांच्या जमिनीत बळजबरीने भराव टाकला जात आहे. भूसंपादन करताना संबंधित शेतकऱ्याला भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत जमीन घेता येत नाही, असे असतानाही सर्व कायदे पायदळी तुडवत बायपासचे काम केले जात असल्याने आज शेतकऱ्यांनी काम बंद पाडून मशिनरी माघारी धाडल्या.









