प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास खटल्याची सुनावणी शनिवारी बेळगावच्या सातवे अतिरिक्त दिवाणी न्यायालयात झाली. झिरो पॉईंट निश्चितीबाबत महामार्ग प्राधिकरणाला सबळ पुरावे सादर करता आले नाहीत. शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे बाजू मांडण्यात आली. याची पुढील सुनावणी आता 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
बायपासचे आरेखन करताना चुकीच्या पद्धतीने झिरो पॉईंट निश्चित करण्यात आल्याने शेतकरी न्यायालयात गेले. फिश मार्केट येथे झिरो पॉईंट असताना तो महामार्ग प्राधिकरणाने हलगा येथून निश्चित केला. परंतु तो निश्चित करताना कोणत्या कायदेशीर बाबींची पूर्तता केली याची माहिती प्राधिकरणाकडे नाही. त्याचे पुरावेही त्यांना शनिवारी न्यायालयात सादर करता आले नाहीत.
तर बासपासचा वापर करता येणार नाही
हलगा-मच्छे बायपासबाबत शेतकऱ्यांनी कधीही नुकसानभरपाई मागितलेली नाही. तसेच झिरो पॉईंट चुकीच्या पद्धतीने निश्चित केल्याने बायपासचे आरेखनच चुकीचे आहे. त्यामुळे जरी बासपासच्या कामाला सुरुवात झाली तरी त्याचा वापर करता येणार नसल्याचे अॅड. रवी गोकाककर यांनी सांगितले. पुढील सुनावणी 28 रोजी होणार असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बाजूने गोकाककर यांनी युक्तिवाद केला.









