21 मार्च रोजी होणार सुनावणी
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. बुधवारी या खटल्याची सुनावणी होणार होती. यामुळे शेतकरी आपल्या मुलांसह न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. मात्र न्यायाधीशांनी पुन्हा हा खटला पुढे ढकलला असून 21 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. यामुळे शेतकरी पुन्हा रिकाम्या हातीच घरी परतले आहेत. हलगा-मच्छे बायपास रस्त्याबाबत न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर मुख्य दिवाणी न्यायालयामध्ये याची सुनावणी सुरू झाली आहे. याठिकाणी शेतकऱ्यांचे वकील रवीकुमार गोकाककर यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली आहे तर राष्ट्रीय महामार्गाच्या वकिलांनीही आपला युक्तिवाद केला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता याचा निकाल देणे गरजेचे आहे. मात्र पुन्हा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून काहीशी नाराजी व्यक्त होत आहे.









