ठेकेदाराकडून यंत्रसामग्रीत वाढ : शेतकऱ्यांच्या लढ्याची धार होतेय कमी
बेळगाव : बायपास विरोधातील शेतकऱ्यांच्या विरोधाची धार कमी होत असल्याचे लक्षात येताच ठेकेदाराने हलगा-मच्छे बायपासच्या कामाला गती दिली आहे. यापूर्वी केवळ एक किंवा दोन जेसीबी लावून करण्यात येणाऱ्या बायपासवर मशनरीत वाढ करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढविण्यात आली आहे. त्यातच काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदारावर दबाव वाढत चालला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून हलगा-मच्छे बायपासच्या कामाला विरोध केला जात असल्याने काम रेंगाळले आहे. रस्त्यावर उतरून विरोध करण्यासह न्यायालयीन लढा देखील दिला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध पायदळी तुडवत बायपासचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. रविवार दि. 12 रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बायपासचे काम बंद पाडले होते. कोणत्याही परिस्थितीत यापुढे रस्त्याचे काम करण्यात येऊ नये, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता.
त्यामुळे ठेकेदाराने काम बंद ठेवले होते. दुसरे दिवशी म्हणजे सोमवार दि. 13 रोजी सकाळी शेतकऱ्यांनी पुन्हा बायपासच्या ठिकाणी धाव घेतली. पण, त्यावेळी काम बंद ठेवण्यात आले होते. तरी देखील शेतकऱ्यांनी ठेकेदाराला धारेवर धरत कागदपत्रे सादर करण्याची मागणी केली. त्यामुळे त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर बेळगाव ग्रामीणचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याऐवजी शेतकऱ्यांना दम देण्याचा प्रयत्न केला. तसेच महसूल आणि भूसंपादन अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून घेऊन कामाला सुऊवात करावी, अशी सूचना केली. काही वेळानंतर भूसंपादनचे प्रांताधिकारी बलराम चव्हाण बायपासच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी बायपासच्या कामाबाबत शेतकऱ्यांना माहिती पटवून दिली. त्यानंतर शेतकरी तेथून निघून गेले. त्याच दिवशी दुपारनंतर ठेकेदाराने पुन्हा बायपासचे काम सुरू केले. त्यानंतर पुन्हा शेतकरी बायपासकडे फिरकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध कमी होत असल्याचे लक्षात येताच ठेकेदाराने कामाची गती वाढविली आहे.









