कोल्हापूर / इम्रान गवंडी :
हॉस्पिटल शासकीय असो अथवा खासगी, लहान असो वा मोठे तेथे परिचारिका असल्याशिवाय वैद्यकीय सेवा, रूग्णांवरील उपचार पूर्ण होऊच शकत नाहीत. केवळ औषधोपचारापुरते त्यांचे कार्य मर्यादित नसून रुग्णांना मानसिक आधार देणे, रूणांच्या कुटुंबीयांना धीर देण्यातही परिचारिकांचा मोलाचा वाटा आहे. कोरोना काळात परिचारिकांनी जीव धोक्यात घालून रूग्णसेवा दिली आहे. रूग्णसेवेत मोलाची सेवा बजावणाऱ्या परिचारिका वैद्यकीय सेवेचा कणा आहेत. आज, सोमवारी 12 मे रोजी जागतिक परिचारिका दिन आहे. या पार्श्वभूमीवर निम्म्या परिचारिकांवरच जिल्ह्यातील रूग्णसेवेचा भार असल्याचे चित्र समोर आले आहे.
दरवर्षी 12 मे रोजी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. परिचर्या क्षेत्राच्या संस्थापिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या जन्मदिनी तो साजरा होतो. परिचारिकांचे मानवतावादी योगदान आणि त्यांच्या नि:स्वार्थ सेवेचा गौरव करण्याच्या उद्देशाने या दिवशी परिचारिकांचा गौरव केला जातो. रूग्णांवर उपचार करताना डॉक्टरांइतकीच परिचारीकांची भुमिका महत्वाची आहे.
यदाच्या नर्सिंग डेची ‘परिचारीकांची काळजी घेणे, अर्थव्यवस्थेला बळकटी देणे’ अशी थीम आहे. मात्र, परिचारिकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. कमी वेतन, जास्त कामाचा ताण, रखडलेली पदोन्नती, रिक्त जागांची खोळंबलेली पदभरती आदी प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. यासाठी वेळोवेळी विविध परिचारीका संघटनांकडून आंदोलने, निवेदने दिली जातात, मात्र, त्यांना केवळ आश्वासनांपुरतेचे मर्यादित रहावे लागत आहे. जागतिक परिचारिका दिन हा त्यांच्या त्याग आणि समर्पणाला पाठबळ देण्याचा दिवस आहे. त्यांच्या सेवेमुळे समाज निरोगी आणि सक्षम बनतो. केवळ एक दिवस मानसन्मान न मिळता वर्षभर त्यांना हा सन्मान मिळणे अपेक्षित आहे. शासनाने त्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या अडचणी सोडवल्या तरच खऱ्या अर्थाने हा दिवस अधिक चांगल्या पद्धतेने त्यांना साजरा करता येईल, असा सुर उमटत आहे.
- परिचारिका भरतीचा प्रस्ताव धुळखात
नॅशनल हेल्थ मिशनकडे परिचारीका भरतीसाठी पाठपुरावा सुरू आहे. रिक्त पदाच्या 50 टक्के भरती करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून पदोन्नती आणि पदभरती रखडली आहे. तसेच भरतीचा प्रस्तावही शासदन दरबारी धुळखात पडला आहे.
- निम्म्या परिचारिकांवर भार
सीपीआर हॉस्पिटलमध्ये नियमानुसार 1100 परिचारीकांची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र, 450 परिचारीकांवर येथील आरोग्य आणि रूग्णसेवेचे काम सुरू आहे. यातील 40 परिचारीकांचे प्रमोशन झाले आहे. 20 वर्षाच्या तुलनेत सीपीआर हॉस्पिटलमध्ये विभाग वाढले, बेडची संख्या वाढली, मेडिकल कॉलेज सुरू झाले, डॉक्टरांची संख्या वाढली. मात्र परिचारीका तेवढ्याच राहिल्या आहेत. अद्यापही निम्म्या परिचारिकांवरच रूग्णसेवा दिली जात आहे.
- पदोन्नतीसह भरतीही रखडली
महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये परिचारीकांची 73 मंजूर पदे आहेत. मात्र, सध्या 28 परिचारीकावरच येथे रूग्णसेवा सुरू आहे. परिचारिकांची 55 पदे रिक्त असली तरी सेवा देण्यात कोणतीही कसूर केली जात नाही. परिचारिकांना 12 तास काम करावे लागत आहे. रजाही मिळत नसून काहीवेळा त्यांना डबल ड्युटी करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही पदोन्नती तर सोडाच, भरतीही केली जात नसल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
- परिचारिकांची तारांबळ
महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये 6 परिचारिकांची आवश्यकता असताना केवळ दोनच परिचारिका सेवा बजावत आहेत. या परिचारिकांची मोठी तारांबळ उडत आहे.
- पाठबळाची गरज
परिचारिकांचे मनोबल वाढण्यासाठी त्यांना पाठबळ देणे गरजचे आहे. सेवा बजावत असताना कुटूंबालाही काहीवेळा वेळ देता येत नाही. एका दिवसासाठी मर्यादित न राहता वर्षभर त्यांना मानसन्मान मिळणे गरजचे आहे. परिचारिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
– मीनाक्षी तांदळे, मेट्रन सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर








