वेळापत्रक जाहीर, विद्यार्थ्यांकडून उजळणीवर भर : 21 पासून दसऱ्याची सुटी
बेळगाव : सहामाही परीक्षेचे वेळापत्रक जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. दि. 12 ते 19 सप्टेंबर दरम्यान टप्प्याटप्प्याने परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने विद्यार्थी, तसेच शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे. सध्या शिक्षण विभागाने पाठ्याक्रमावर आधारित मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केला असला तरी सहामाही, तसेच वार्षिक परीक्षादेखील होणार आहेत. 21 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत दसऱ्याची सुटी असल्याने त्यापूर्वी परीक्षा घेण्याचे नियोजन जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे. या परीक्षेचे वेळापत्रक आठ दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार नियोजन केले जात आहे. पहिली ते पाचवीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात तर सहावी ते नववीच्या परीक्षा दुपारच्या सत्रात घेतल्या जाणार आहेत. दहावीच्या परीक्षा या बोर्डाच्या वेळापत्रकानुसार घेतल्या जाणार आहेत. गणेश विसर्जनानंतर विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.
पहिली ते पाचवी
दि. 12 सप्टेंबर-प्रथम भाषा, दि. 13-शारीरिक शिक्षण व कला, दि. 15 द्वितीय भाषा, दि. 16- गणित, दि. 17-परिसर अभ्यास.
सहावी ते सातवी
दि. 12 सप्टेंबर-प्रथम भाषा, दि. 13-समाज विज्ञान, दि. 15-तृतीय भाषा, दि. 16-विज्ञान, दि. 17-द्वितीय भाषा, दि. 18-गणित, दि. 19-शारीरिक शिक्षण व कला.
आठवी ते नववी
दि. 12 सप्टेंबर-प्रथम भाषा, दि. 13-तृतीय भाषा, दि. 15-गणित, दि. 16- विज्ञान, दि. 17 द्वितीय भाषा, दि. 18 समाज विज्ञान, दि. 19-शारीरिक शिक्षण.









