वाळपई : होंडा पंचायत क्षेत्रातील सालेली येथील अर्जुन चंदू गावकर यांच्या घराच्या निम्मा भाग कोसळल्यामुळे कुटुंबासमोर अडचण निर्माण झाली आहे. सदर घटना बुधवारी सकाळी घडली. एका बाजूचा भाग पूर्णपणे कोसळलेला आहे. याबाबतची माहिती अशी की गेल्या तीन दिवसांपासून सत्तरी तालुक्यात दमदार पाऊस लागत आहे. यामुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक पडझडी व नुकसानी होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. होंडा पंचायत क्षेत्रातील सालेली येथील अर्जुन गावकर यांच्या मातीच्या घराचा निम्मा भाग कोसळला. यामुळे घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. सदर कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. यामुळे या कुटुंबासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.
दरम्यान, जेमतेम अर्थिक उत्पन्नावर संसाराचा गाडा चालवत आहोत. मात्र अनेकवेळा आर्थिक अडचण निर्माण होत असते. या घराच्या ठिकाणी नवीन घर बांधण्याची इच्छा मनात आली. मात्र ते शक्य झाले नाही. सरकारने घराच्या पडझडीची दखल घेऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी अर्जुन गावकर यांनी केली आहे. स्थानिक आमदार डॉ. देविया राणे यांनी या घटनेची दखल घेऊन मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबाकडून केली जात आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस लागत असल्यामुळे शिल्लक भागही पावसामध्ये भिजत आहे. यामुळे मातीच्या भिंती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे.









