खासदारांना निवेदन दिले, घोषणाबाजीने गोलबागेचा परिसर दणाणून सोडला
प्रतिनिधी/ सातारा
सध्या देशाचा कारभार म्हणजे अंधेरी नगरी चौकट राजा असा सुरु आहे. त्याचा तोटा 70 लाख पेन्शनरांना बसलेला आहे. पेन्शनरांच्या हक्कासाठी खासदारांना निवेदन देऊन त्यांना लोकसभेत, राज्यसभेत कायद्यात बदल करण्याची विनंती करणार आहोत. 35 वर्षापूर्वी साताऱयात एवढय़ा रिक्षा होत्या का, एवढे बसस्थानक होते काय, कामगार वाढले, त्या कामागारांच्या पेन्शनचा प्रश्न तसाच आहे, असे सर्व श्रमिक संघाचे अतुल दिघे यांनी सांगितले.
गोलबागेच्या समोर सर्व श्रमिक संघाच्यावतीने थाळी वाजवत अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अतुल दिघे, अनंत कुलकर्णी, प्रमोद परामणे, गजानन लंगडे, शंकर पाटील यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. किमान 9 हजार पेन्शन मिळालीच पाहिजे. महामाई भत्ता मिळालाच पाहिजे. जो पेन्शन का काम ना करे ओ सरकार निकम्मा है अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडले.
यावेळी अतुल दिघे म्हणाले, या सरकारने पेन्शनरांवर अन्याय केलेला आहे. न्याय मिळवून देण्यासाठी खासदारांना निवेदन देणार आहोत. साताऱयाला दोन खासदार आहेत. खासदारांच्यापुढे अनेक प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नांचा ते अभ्यास करतील असेही नाही. आमचा प्रश्न काय आहे याचे निवेदन त्यांना देणार आहोत. सुप्रिम कोर्टाने एखादी गोष्ट ठरवली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना केली. त्या राज्यघटनेप्रमाणे जनता श्रेष्ठ आहे. जनता श्रेष्ठ म्हणजे जनतेचे प्रतिनिधी श्रेष्ठ आहेत. ते कायद्यात बदल करु शकतात. रिकामी थाळी वाजवून दाखवल्यानंतर आम्ही खासदारांना निवेदन देणार आहोत. त्यांना सांगणार आहोत. त्या ठिकाणी लोकसभेत, राज्यसभेत कायदा बदलण्याकरता काम करा. आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे असे काम करा. असे आम्ही का म्हणतोय तर आम्ही देशाची संपत्ती तयार केली. 35 वर्षापूर्वी सातारा शहरात एवढय़ा रिक्षा होत्या का, एसटी स्टॅण्ड एवढे होते का?, एसटी कामगार, रिक्षा कामगार वाढले. 9 हजार रुपये पेन्शन दिली पाहिजे. 9 हजार, अशी मागणी केली.









