दक्षिण आफ्रिका प. डाव सर्व बाद 152, ऑस्ट्रेलिया प. डाव 5 बाद 145
वृत्तसंस्था/ सिडनी
शनिवारपासून गब्बा मैदानावर सुरु झालेल्या यजमान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या क्रिकेट कसोटीत दोन्ही संघातील गोलंदाजांनी एकूण 15 बळी मिळवित दिवस गाजविला. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 152 धावात रोखल्यानंतर त्यांनी दिवसअखेर 5 बाद 145 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात व्हेरेनीने अर्धशतक झळकविले. तर ऑस्ट्रेलियाच्या डावात हेडने नाबाद अर्धशतक नोंदविले आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. पाचव्या षटकापासूनच दक्षिण आफ्रिकेच्या डावाला गळती सुरु झाली. स्टार्कने कर्णधार एल्गारला 3 धावांवर झेलबाद केले. बोलँडने इर्विला 10 धावावर बाद केले. त्यानंतर कमिन्सने व्हॅन डेर डय़ुसेनला 5 धावांवर झेलबाद केले. बोलँडने दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना झोंडोला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत केले. दक्षिण आफ्रिकेची स्थिती यावेळी 11 षटकात 4 बाद 27 अशी केविलवाणी झाली होती. त्यानंतर बेहुमा आणि व्हेरेनी यांनी संघाचा डाव बऱयापैकी सावरताना पाचव्या गडय़ासाठी 98 धावांची भागिदारी केली. स्टार्कने बेहुमाचा त्रिफळा उडविला. त्याने 3 चौकारांसह 38 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी झटपट गुंडाळले. व्हेरेनीने 96 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 64 धावा जमविल्या. रबाडाने 1 चौकारासह नाबाद 10 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात केवळ 4 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क आणि लियॉन यांनी प्रत्येकी 3 तर कमिन्स आणि बोलँड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दक्षिण आफ्रिकेच्या अचूक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा डावही पहिल्या षटकापासूनच घसरला. डावातील पहिल्याच चेंडूवर रबाडाने वॉर्नरला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. अलीकडच्या काही कालावधीत फलंदाजीत बहरलेला लाबूशेन जेनसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 2 चौकारांसह 11 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या नॉर्त्जेने उस्मान ख्वाजाला बदली खेळाडू हार्मेरकरवी झेलबाद केले. त्याने 11 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची स्थिती यावेळी 3 बाद 27 अशी होती. स्टिव्ह स्मिथ आणि हेड यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या गडय़ासाठी 117 धावांची भागिदारी केली. नॉर्त्जेने स्मिथचा त्रिफळा उडविला. त्याने 68 चेंडूत 3 चौकारांसह 36 धावा जमविल्या. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर रबाडाने बोलँडला एका धावेवर झेलबाद केले. मात्र ट्रेव्हिस हेड 77 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह 78 धावांवर खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडा आणि नॉर्त्जे यांनी प्रत्येकी 2 तर जेनसनने 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कला कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळींचा टप्पा गाठण्यासाठी आता केवळ एका बळीची गरज आहे.
संक्षिप्त धावफलक – दक्षिण आफ्रिका प. डाव ः 48.2 षटकात सर्व बाद 152 (व्हेरेनी 64, बेहुमा 38, इर्वि 10, रबाडा नाबाद 10, स्टार्क 3-41, कमिन्स 2-35, बोलँड 2-28, लियॉन 3-14), ऑस्ट्रेलिया प. डाव ः 33.1 षटकात 5 बाद 145 (हेड खेळत आहे 78, स्टिव्ह स्मिथ 36, ख्वाजा 11, लाबुशेन 11, वॉर्नर 0, रबाडा 2-50, नॉर्त्जे 2-37, जेनसन 1-15).









