पाकविरुद्ध भारताच्या 2 बाद 147 धावा, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना आज पुढे खेळविणार
वृत्तसंस्था/ कोलंबो
रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी आक्रमक फलंदाजीचा मास्टरक्लास दाखवत अर्धशतके नोंदवल्यानंतर भारताने आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरमधील पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे तहकूब करण्यात आला. सोमवारी राखीव दिवशी हा सामना पुढे खेळविला जाईल. मात्र सोमवारीही पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
राखीव दिवशीचा खेळ सोमवारी दुपारी 3 वाजता सुरू होईल. प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने 24.1 षटकांत 2 बाद 147 धावांची भक्कम मजल मारली होती. पण सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पावसास सुरुवात झाल्याने खेळ थांबवावा लागला. पंचांनी नंतर दोनदा निरीक्षणे केली. पण पुन्हा पाऊस सुरू झाल्यानंतर त्यांनी रविवारी पुढे खेळ होणार नसल्याचे सांगितले. खेळ थांबवण्यात आला त्यावेळी कोहली 8 व केएल राहुल 17 धावांवर खेळत होते. या धावसंख्येवरून सोमवारी ते खेळाला पुढे सुरुवात करतील. सलग तीन दिवस मैदानात उतरण्याची वेळ भारतावर आली आहे. कारण मंगळवारी भारताचा सामना लंकेविरुद्ध होणार आहे.
पावसास सुरुवात होण्याआधी कर्णधार रोहित शर्मा व गिल यांनी आक्रमक फलंदाजी करीत शानदार अर्धशतके नोंदवली. रोहितने 49 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह 56 तर गिलने 52 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 58 धावा फटकावल्या. या दोघांनी 100 चेंडूत 121 धावांची फटेकबाज भागीदारी केली.
पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांविरुद्ध वर्चस्व गाजविण्याची गरज असल्याचे शनिवारी गिलने म्हटले होते. रविवारी भारतीय सलामीवीरांनी नेमके तसेच केले. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या आत येणाऱ्या चेंडूने रोहितला वारंवार त्रास दिला आहे. पण यावेळी तो चांगली तयारी करून आला होता. त्याने थोडासा ओपन स्टान्स ठेवल्याने आफ्रिदीला तो प्रभावीपणे खेळताना दिसला. त्याने त्याच्या एका चेंडूवर फ्लिकचा शानदार षटकारही नोंदवला. गिलने नंतर त्याचाच कित्ता गिरवित आफ्रिदीला एकूण 6 चौकार ठोकले. यापैकी तिसऱ्या षटकात त्याने तीन चौकार मारले. मनगटी फ्लिक्स फटके मारत त्याने दोन चौकारही वसूल केले.
पॉवरप्लेमध्ये भारताने बिनबाद 61 धावांची मजल मारली होती. आफ्रिदी प्रथमच पॉवरप्लेमध्ये बळी मिळवू शकला नाही. हवामान अनुकूल असते तेव्हा दुसरा पेसर नसीम शहा धोकादायक ठरतो. याशिवाय त्याला थोडा बाऊन्सही मिळत होता. अशाच एका चेंडूवर रोहित सुदैवाने बचावला. लेगस्पिनर शदाब खान आल्यावर रोहितने त्याच्या दोन षटकात 3 शानदार षटकार लगावले. पण नंतर शदाबनेच त्याचा बळी मिळविला. रोहितने त्याला उंचून फटका मारला. पण फहीन अश्रफने त्याचा आरामात झेल टिपला. दोनच धावांची भर पडल्यावर गिलही बाद झाला. शाहीन आफ्रिदीने त्याचा बळी मिळविला. सलमान आगाने त्याचा झेल टिपला.
श्रेयस अय्यरच्या जागी घेतलेल्या केएल राहुलने कोहलीच्या साथीने हळूहळू धावा वाढवायला सुरुवात केली होती. पण पावसाच्या सरी सुरू झाल्यानंतर खेळ थांबवणे भाग पडले. मैदानी कर्मचाऱ्यांनी पाऊस थांबल्यानंतर मैदान कोरडे करण्याचा खूप प्रयत्न केला. पण अंतिम निरीक्षण सुरू असतानाच पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर खेळ होणार नसल्याचे पंचांनी जाहीर केले.
संक्षिप्त धावफलक : भारत 24.1 षटकांत 2 बाद 147 : रोहित शर्मा 49 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह 56, गिल 52 चेंडूत 10 चौकारांसह 58, राहुल खेळत आहे 17, कोहली खेळत आहे 8, अवांतर 8. शाहीन आफ्रिदी 1-37, शदाब खान 1-45.









