वृत्तसंस्था / ब्रिस्बेन
येथे सुरू असलेल्या चार दिवसांच्या अनाधिकृत एकमेव कसोटी सामन्यात शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर यजमान ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने पहिल्या डावात 5 बाद 158 धावा जमविल्या. तत्पूर्वी राघवी बिस्त आणि व्हीजे जोशिता यांची शानदार अर्धशतके आणि तळाच्या इतर फलंदाजांनी दिलेल्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर भारत अ महिला संघाने पहिल्या डावात 299 धावांपर्यंत मजल मारली.
या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवशी पावसाच्या वारंवार आलेल्या अडथळ्यांमुळे केवळ 23 षटकांचा खेळ झाला आणि प्रथम फलंदाजी करताना भारत अ महिला संघाचा पहिला डाव गडगडला होता. दिवसअखेर त्यांनी 5 बाद 93 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरुन भारत अ महिला संघाने दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरूवात केली. कर्णधार राधा यादव आणि बिस्त यांनी सहाव्या गड्यासाठी 64 धावांची भागादरी केली. राधा यादवने 33 धावांचे योगदान दिले. यादव बाद झाल्यानंतर बिस्तने मिन्नू मणीसमवेत सातव्या गड्यासाठी 75 धावांची भागिदारी करुन संघाला सुस्थितीत नेले. मणीने 28 धावा जमविल्या. बिस्तने 153 चेंडूत 16 चौकारांसह 93 धावांचे योगदान दिले. बिस्तचे शतक केवळ सात धावांनी हुकले. भारत अ महिला संघाच्या पहिल्या डावातील 63 व्या षटकात ऑस्ट्रेलिया अ महिला संघाच्या ब्राऊनने बिस्तला बाद केले. ब्राऊनने मणीचा त्रिफळा उडविला. जोशिता आणि तितास साधू यानी नवव्या गड्यासाठी 75 धावांची भागिदारी केली. मिल्सने जोशिताचा त्रिफळा उडविला. जोशिताने 72 चेंडूत 7 चौकारांसह 51 धावांचे योगदान दिले. भारत अ महिला संघाचा पहिला डाव 89.1 षटकात 299 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलिया अ महिला संघातर्फे जॉर्जीया प्रेस्टवीजने 37 धावांत 3 तर ब्राऊनने 65 धावांत 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल दाखल खेळताना ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने दुसऱ्या दिवसाअखेर पहिल्या डावात 5 बाद 158 धावा जमविल्या. कर्णधार ताहिला विल्सन आणि रॅचेल ट्रेनमन यांनी सलामीच्या गड्यासाठी 46 धावांची भागिदारी केली. कर्णधार विल्सनने 49 धावा तर ट्रेनमनने 21 धावा जमविल्या. खेळ थांबला त्यावेळी यष्टीरक्षक निकोल फल्टम 30 तर जिंजर 24 धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलिया अ महिला संघ अद्याप 141 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे पाच गडी खेळावयाचे आहेत. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी आहेत. भारत अ महिला संघातर्फे सायमा ठाकुरने 21 धावांत 2 तर राधा यादवने 40 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: भारत अ महिला संघ प. डाव 89.1 षटकात सर्वबाद 299 (राघवी बिस्त 93, जोशिता 51, मणी 28, राधा यादव 31, तितास साधू 23, प्रेस्टवडज व ब्राऊन प्रत्येकी 3 बळी,), ऑस्ट्रेलिया अ प. डाव 43 षटकात 5 बाद 158 (ताहीला विल्सन 49, फल्टम खेळत आहे 30, जिंजर खेळत आहे 24, ट्रेनमन 21, सायमा ठाकुर व राधा यादव प्रत्येकी 2 बळी).









