वंदे भारत एक्स्प्रेसचा टिळकवाडीत अजब प्रकार
प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूरहून बेळगावला येणारी वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री टिळकवाडीच्या दुसरे रेल्वेगेट परिसरात तब्बल अर्धा तास थांबली. बेळगावजवळ येऊन वंदे भारत का थांबली? याची विचारणा प्रवाशांनी लोको पायलटकडे केली असता पहिले रेल्वेगेट बंद न झाल्याने विलंब झाल्याचे उत्तर देण्यात आले. या प्रकारामुळे प्रवाशांना अर्धा तास रेल्वेमध्येच बसावे लागले. टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेटमध्ये वारंवार तांत्रिक दोष निर्माण होत आहेत. शुक्रवारी बेंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस रात्री 10 च्या सुमारास दुसरे रेल्वेगेट परिसरात आली. परंतु, ही रेल्वे तेथेच थांबविण्यात आली. रेल्वेस्थानकात इतर एक्स्प्रेस असल्यामुळे वंदे भारत थांबविण्यात आली असावी, असा प्रवाशांचा समज झाला. परंतु, अर्धा तास होत आला तरीही रेल्वे एकाच जागी थांबल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
काही प्रवाशांनी लोको पायलटला यासंदर्भात विचारले असता त्यांनी पहिले रेल्वेगेट बंद न झाल्यामुळे रेल्वे थांबवावी लागल्याचे उत्तर दिले. रात्री 10.30 वाजता वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेस्थानकात पोहोचली. तब्बल अर्धा तास उशीर झाल्याने प्रवाशांनी आपला रोष व्यक्त केला. काही प्रवाशांनी हा आपला अनुभव समाजमाध्यमांवर प्रसारित करून रेल्वेकडे तक्रार केली आहे.









