वृत्तसंस्था / मेलबोर्न
2025 च्या टेनिस हंगामातील येथे जानेवारीत होणाऱ्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत रुमानियाच्या 33 वर्षीय सिमोना हॅलेपला स्पर्धा आयोजकांनी वाईल्डकार्डद्वारे प्रवेश दिला आहे.
33 वर्षीय हॅलेपने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत दोनवेळा ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. 2018 साली ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद तसेच फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत जेतेपद आणि 2019 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत जेतेपद मिळविले होते. महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत तिने काही कालावधीसाठी अग्रस्थानही मिळविले होते. 2022 नंतर तिने एकही प्रमुख ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला नाही. उत्तेजक चाचणी प्रकरणी हॅलेप दोषी ठरली होती. त्यानंतर ती सुमारे दीड वर्ष टेनिस क्षेत्रापासून अलिप्त होती. वयाच्या आपल्या 15 व्या वर्षी हॅलेपने ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत पदार्पण केले होते. 2025 ची ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा मेलबोर्नमध्ये 12 जानेवारीपासून सुरू होणार असून तत्पूर्वी म्हणजे 6 ते 9 जानेवारी दरम्यान पात्र फेरीचे सामने खेळविले जातील.









