स्वदेशी लढाऊ विमान ’तेजस एमके1ए’मध्ये वापरले जाणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
हिंदुस्थान एअरोनॉक्टिस लिमिटेडला (एचएएल) भारताच्या तेजस एमके1ए या लढाऊ विमान कार्यक्रमासाठी अमेरिकेकडून तिसरे जीई-404 इंजिन प्राप्त झाले आहे. तर चौथे इंजिन चालू महिन्याच्या अखेरपर्यंत भारतात पोहोचणार असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. भारतीय वायुदलाच्या ताफ्यातून चालू महिन्यात मिग-21 विमाने निवृत्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वायुदलाला स्वत:ची स्क्वाड्रन्स क्षमता कायम राखण्यासाठी नव्या लढाऊ विमानांची गरज भासत आहे. अशास्थितीत अमेरिकेकडून इंजिनचा पुरवठा होऊ लागल्याने तेजस लढाऊ विमानांचा वायुदलात लवकर समावेश होण्याची अपेक्षा वाढली आहे. एचएएलला चालू आर्थिक वर्ष समाप्त होण्यापूर्वी एकूण 12 जीई-404 इंजिन्स मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय वायुदलाने पूर्वीच 83 तेजस एमके1ए विमानांची ऑर्डर दिली आहे. तर 97 अतिरिक्त लढाऊ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव सद्यकाळात मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
एफ404-आयएन20 इंजिन
2021 मध्ये भारताने 99 एफ404-आयएन20 इंजिन खरेदीसाठी जनरल इलेक्ट्रिकसोबत 716 दशलक्ष डॉलर्सचा करार केला होता. परंतु सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या दक्षिण कोरियन कंपनीबाबत समस्या निर्माण झाल्याने आणि जागतिक पुरवठासाखळीत अडथळे निर्माण झाल्याने पुरवठ्याला विलंब झाला.
वायुदलाच्या ताफ्यात तेजसचा समावेश
भारतीय वायुदलाची एमके1ए आणि एमके2 दोन्ही वर्जन्सना मिळून 352 तेजस लढाऊ विमानांना ताफ्यात सामील करण्याची योजना आहे. मागील काही अडथळ्यानंतरही चालू वर्षात स्वत:च्या प्रतिबद्धता पूर्ण करण्याच्या मार्गावर असल्याचे आश्वासन एचएएलने दिले आहे. तर पुढील आर्थिक वर्षापासून इंजिन्सचा पुरवठा स्थिर होण्याची अपेक्षा आहे, यामुळे लढाऊ विमानांच्या जलद निर्मितीचा मार्ग प्रशस्त होईल. सार्वजनिक आणि खासगी दोन्ही प्रकारच्या भागीदारांच्या सहकार्याने दरवर्षी 30 तेजस विमानांची निर्मिती करण्याचे एचएएलचे लक्ष्य आहे.









