दरवर्षी किमान सहा-सात पर्यटक गमावताहेत जीव : पाटबंधारे खात्याने पाण्याभोवती कुंपण घालण्याची मागणी
रविंद्र मोहिते /तुडये
निसर्गरम्य चंदगड तालुक्याच्या ठिकाणापासून 40 कि.मी. तर कर्नाटकातील बेळगाव शहरापासून 25 कि. मी. अंतरावरील हाजगोळी येथील ग्रामदैवत श्री चाळोबा मंदिराच्या टेकडी सभोवती असलेल्या तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नयनरम्य परिसर पाहण्यासाठी शनिवार-रविवार आणि मंगळवारी पर्यटकांची मोठी गर्दी होते. पर्यटकांना या धरणाच्या पाण्याचा अंदाज नसल्याने बुडणाऱ्या पर्यटकांचा आकडा अर्धशतकापर्यंत वाटचाल करत आहे. दरवर्षी किमान सहा-सात पर्यटक बुडत आहेत. ग्राम पंचायतीनेही अनेक उपाययोजना केल्या. मात्र त्या काही काळापुरताच अबाधित राहिल्या आणि हा परिसर म्हणजे मृत्यूचा सापळाच ठरला आहे. शनिवार दि. 10 जून रोजी बेळगाव येथील अल्ताफ खान हे आपल्या पत्नी, दोन मुलगे, मुलगीसह या परिसरात वनडे ट्रीप म्हणून आले आणि दोन लहान मुले बुडाल्याने गमावण्याची वेळ आली. वडील अल्ताफ हे बुडताना पाहताच 15 वर्षाचा रेहान आणि 12 वर्षाचा मुस्ताफा या मुलांनी आपल्या बुडणाऱ्या वडिलांपर्यंत जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. बुडणाऱ्या पतीला वाचविण्यासाठी पत्नीने आपली ओढणी पतीकडे टाकत बाहेर घेण्यास आपल्या जीवाची पर्वा केली नाही. मात्र, पोटच्या दोन मुलांना गमावण्याची वेळ या माउलीवर आली. मृत्यूचा सापळा बनलेल्या याठिकाणी रविवारी बेळगाव शहर आणि उपनगरांतील पर्यटकांची मोठी गर्दी होते. मद्यसेवनानंतर रिकाम्या बाटल्या फोडण्यात धन्यता मानणाऱ्या मद्यपींमुळे धरण परिसरात ठिकठिकाणी बाटल्यांच्या काचांचा खच पडला आहे. चाळोबा मंदिर टेकडी सभोवती केवळ फूट-दोन फूट अंतरातील पाण्यात गेल्यास पाणी कमी वाटते. त्यानंतर 20 ते 40 फूट खोली असलेली पाण्याची ठिकाणे सभोवती आहेत. नव्या-नवख्या पर्यटकांना या पाण्याचा अंदाज येत नाही. अचानकपणे खोली लक्षात न आल्याने पाण्यात गेलेला पर्यटक सरळ बुडतो. बुडालेल्यांचा मृतदेह हा दुसऱ्या दिवशीच शोधमोहिमेनंतर सापडलेल्या घटना घडल्या आहेत. या पर्यटनस्थळी पर्यटकांना येण्यास हाजगोळी ग्रा. पं. ने चार वर्षांपूर्वी मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांनी याठिकाणी येणे सोडले नाही. कोरोनाकाळात याठिकाणी दोन वर्षे कोणीही फिरकले नाही. मात्र मागील वर्षापासून पर्यटकांचा ओघ वाढला आहे. ग्रा. पं. ने धोका दर्शवणारे फलक याठिकाणी लावले होते. सध्या येथील हे फलक गायब झाले आहेत. रविवार व अन्य सुटीदिवशी वाहन पार्किंगची वसुली करण्यात येते. मात्र, सदर पैसे कोठे जातात, हे समजत नाही.
धोकादायक पर्यटनस्थळी लोक येतात तरी का?
ग्रा. पं. नेही या पर्यटनस्थळी कोणतीच खबरदारी घेतलेली दिसत नाही. पर्यटकांचे वारंवार जीव जात असताना धोकादायक ठिकाणी पाण्यासभोवती काटेरी कुंपण उभारत पर्यटकांना पाण्यात जाण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे. येथील पाण्यात उतरताना परिसरातील ग्रामस्थ भीती व्यक्त करतात. मात्र पर्यटक बेधडक पाण्यात उतरत आपले जीव गमावतात. या धोकादायक पर्यटनस्थळी लोक येतात तरी का? असा सवाल ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. बेळगाव परिसरातील पर्यटक मात्र याकडे डोळेझाक करत पुन्हा या परिसरात पार्ट्या करण्यासाठी येतात. यापुढे तरी बेळगाव परिसरातील पर्यटक या धोकादायक स्थळाकडे येणे टाळतात का? हे पहावे लागेल. पर्यटकांच्या जीवाची कोणतीच सुरक्षा नसलेल्या या पर्यटन स्थळासभोवती असलेले पाणी हे तिलारी जलविद्युत प्रकल्पाचे आहे. पाटबंधारे खात्याने या परिसराकडे आजपर्यंत कोणतीच सुविधा अथवा सुरक्षा पुरविलेली नाही. त्यामुळे पाटबंधारे खात्याने पाण्यासभोवती काटेरी कुंपण घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.









