वृत्तसंस्था/ पोर्ट औ प्रिन्स
हैतीचे पंतप्रधान एरियल हेन्री यांनी अखेरच राजीनामा दिला आहे. क्षेत्रीय नेत्यांनी जमैकामध्ये राजकीय परिवर्तनाच्या रुपरेषेवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतल्याच्या पार्श्वभूमीवर हेन्री यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले आहे. हैतीमध्ये सशस्त्र गट हेन्री यांचे सरकार पाडविण्याचा प्रयत्न करत होते.
गयानाचे अध्यक्ष आणि कॅरेबियन समुदायाचे वर्तमान अध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांनी हैतीचे पंतप्रधान एरियल हेन्री यांच्या राजीनाम्याची पुष्टी दिली आहे. 74 वर्षीय हेन्री यांनी कॅरिकोम नेत्यांकडून हैतीच्या स्थितीवर आपत्कालीन शिखर परिषद आयोजित करण्यात आल्यावर स्वत:चा राजीनामा दिला आहे. देशात वारंवार निवडणुका स्थगित झाल्याने सुरू झालेल्या हिंसेने अराजक स्थिती निर्माण झाली आहे.
अंतरिम पंतप्रधान नियुक्त होणार
गयानचे अध्यक्ष इरफान अली यांनी संक्रमणकालीन अध्यक्षीय परिषदेची स्थापना आणि अंतरिम पंतप्रधान नियुक्त करण्याची शिफारस केली आहे. अध्यक्षीय परिषदेत दोन पर्यवक्षेक आणि 7 सदस्य असतील, ज्यात अनेक पक्षीय आघाड्या, खासगी क्षेत्र, नागरी समुदाय आणि धार्मिक नेते सामील असतील. परिषदेला जलदपणे अंतरिम पंतप्रधान नियुक्त करण्याचा आदेश देण्यात आल्याचे अली यांनी सांगितले आहे.
केनियात पोहोचले हेन्री
हैतीमध्ये अनेक दिवसांपासून हिंसा सुरू आहे. सशस्त्र गटांकडून एरियल हेन्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. काही दिवसांपूर्वी हेन्री यांनी केनियात जात तेथून अमेरिकेकडून सहकार्याची मागणी केली होती. परंतु देशामधील हिंसा तीव्र झाली तसेच काही दिवसांपूर्वी सशस्त्र गटांनी तुरुंग फोडल्याने हजारोंच्या संख्येत कैदी फरार झाले होते.
स्थिती बिकट
हैतीमधील वाढती हिंसा पाहता अमेरिकेने स्वत:च्या दूतावासातील काही कर्मचाऱ्यांना मायदेशी परत बोलाविले होते. याचदरम्यान जर्मनी आणि युरोपीय महासंघाने देखील अशाचप्रकारचे पाऊल उचलले आहे. कॅरेबियन देश हैतीमध्ये गृहयुद्ध सुरु आहे. हिंसेमुळे 3 लाख 62 हजार लोक विस्थापित झाले आहेत. सशस्त्र गटांनी देशाच्या राजधानीवर कब्जा केला आहे.