पुणे / प्रतिनिधी :
राज्याच्या काही भागात बुधवारपासून तुरळक पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा धडकी भरली आहे. गेल्या आठवडय़ातील उत्तर महाराष्ट्र, विदर्भात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, कांदा, केळी, द्राक्षे आदी पिकांना यांचा मोठा फटका बसला असून, कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. यातून बळीराजा अद्याप सावरला नसतानाच पुन्हा गारपिटीचे संकट उभे राहिले आहे.
पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा हवेच्या कमी दाबाचा ‘आस’ व त्याच्या खालच्या पातळीतून उलट दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे तसेच बंगालच्या उपसागराहून आग्नेयकडून घुसणारे आर्दतायुक्त पण ‘आसा’ला घासून जाणाऱ्या वाऱ्याच्या धडकेमुळे मध्य प्रदेश, तेलंगणासह महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बुधवारपासूनच पाऊस
वातावरणातील बदलामुळे राज्यात बुधवारपासूनच (15) पावसाला सुरुवात होणार असून, 18 मार्चपर्यंत पाऊस असेल. त्यात गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तसेच शुक्रवारी व शनिवारी केवळ विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
गारपीटीसह पावसाची शक्यता
ज्येष्ठ हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील खालील भागात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता जाणवते.
विदर्भ – गुरुवार व शुक्रवार (16 व 17 मार्च ) विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळजिल्ह्यात शक्यता अधिक
मराठवाडा – गुरुवार, 16 मार्चपर्यंत विशेषतः उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शक्यता अधिक
मध्य महाराष्ट्र – मंगळवारपासून ते गुरुवार, 16 मार्च, विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात शक्यता अधिक
कमाल तापमानात घट
राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर कमाल तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण-गोव्यात असलेली उष्णतेची लाटही ओसरली आहे.








