अज्ञात हल्लेखोरांनी घरातच झाडल्या गोळ्या : खैबर पख्तूनख्वामधील घटना
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीत असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा मौलाना काशिफ अली याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या राजकीय शाखेचा प्रमुख मौलाना काशिफ अली याची हत्या करण्यात आली आहे. सोमवारी अज्ञात हल्लेखोरांनी स्वाबी येथील त्याच्या घरी त्याच्यावर हल्ला केला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
हल्लेखोरांनी काशिफ अलीवर त्याच्या घराच्या दरवाजातच स्वयंचलित शस्त्रांनी गोळ्या घातल्या. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आणि पाकिस्तानातील काही स्थानिक ठिकाणी या हत्येबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. तथापि, पोलिसांना अद्याप हल्लेखोरांबद्दल कोणताही सुगावा लागलेला नाही. मौलाना काशिफ अली हा लष्कर-ए-तोयबाच्या राजकीय संघटनेच्या पाकिस्तान मरकझी मुस्लीम लीगचे नेतृत्व करत होता. ही संघटना 2024 मध्ये लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याने स्थापन केली होती. विशेष म्हणजे काशिफ अली हा भारताचा वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा देखील होता.
लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांचा नाश
गेल्या एका महिन्यात लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी मृत्युमुखी पडले असून त्यापैकी दोघे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले आहेत, अशी माहिती आहे. आता काशिफ अलीच्या हत्येनंतर ही संघटना पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. हाफिज सईद हा एक खतरनाक पाकिस्तानी दहशतवादी आहे. तो लष्कर-ए-तोयबाची (एलईटी) मुख्य संघटना जमात-उद-दावाचा (जेयूडी) संस्थापक आहे. तो 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. भारतासह अनेक देशांनी त्याला दहशतवादी घोषित केले आहे. तथापि, पाकिस्तान सतत त्याचे संरक्षण करत आहे.









