अबू कताल याची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या : भारतातील हल्ल्यांमध्येही सहभाग ‘मोस्ट वॉन्टेड’
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
भारतातील दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या आणखी एका दहशतवाद्याचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आला आहे. लष्कर-ए-तोयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कताल उर्फ कताल सिंधी याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. अबू कताल हा लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा पुतण्या होता. शनिवारी रात्री पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम येथे त्याला लक्ष्य करण्यात आले. झिया-उर-रहमान उर्फ नदीम उर्फ अबू कताल उर्फ कताल सिंधी हा भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये हवा होता.
अबू कताल हा हाफिज सईदच्या खूप जवळचा होता. हाफिज सईदने त्याला ऑपरेशनल कमांडर बनवले होते. कतालने पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली येथे एक छावणी चालवली होती. या छावणीमधूनच राजौरी-पूंछ भागांमध्ये दहशतवादी कुरापती घडवल्या जात होत्या. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा कट रचण्यात आणि ड्रोनद्वारे शस्त्रs टाकण्यात कतालचा थेट सहभाग होता. तसेच जम्मू-काश्मीरमधील रियासी जिह्यात यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्यात कतालने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतीय सुरक्षा संस्था बराच काळ त्याचा शोध घेत होत्या. कतालचा मृत्यू लष्कर-ए-तोयबासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तो भारतातील दहशतवादी घटनांमध्ये सहभागी होता. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिह्यातील यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याची योजना कतालने आखली होती.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, कताल त्याच्या टोयोटा पिकअपमधून प्रवास करत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांना संध्याकाळी 7-8 च्या सुमारास गोळीबार झाल्याचे वृत्त मिळाले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मागच्या सीटवर बसलेला त्याचा गनरही मारला गेला. तसेच चालकही जखमी झाला. घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. येथे आलेल्या मोटारसायकलस्वारांनी गाडी थांबवत तुफान गोळीबार सुरू केला. यादरम्यान, कतालच्या दिशेने 14 ते 15 गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात आले. मृत झालेल्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कताल याचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पुढचे लक्ष्य दाऊद इब्राहिम?
पाकिस्तानमध्ये भारताविरुद्ध कारवाया आणि हल्ले करणाऱ्या हाय-प्रोफाइल दहशतवाद्यांना संपवण्याची प्रक्रिया सुरूच आहे. अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून एकामागून एक मोस्ट वॉन्टेड आणि ब्लॅकलिस्टेड दहशतवादी मारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अज्ञात बंदूकधाऱ्यांचे पुढील लक्ष्य कोण आहे? फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम लक्ष्य आहे का? असे प्रश्न चर्चेत आहेत. फरार डॉन दाऊद इब्राहिम हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आहे. भारतात कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी दाऊद पाकिस्तानात पळून गेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील कराची शहरात तो वास्तव्यास असल्याचे बोलले जाते. दाऊदला पाकिस्तान सरकार, लष्कर आणि आयएसआयकडून आश्रय मिळालेला आहे. भारताने यापूर्वी अनेकदा शेजारी देशाला दाऊदला ताब्यात देण्याची विनंती केली आहे, परंतु आतापर्यंत पाकिस्तानने यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.









